For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेस्ट इंडीज क्रिकेटची ऐशी की तैशी!

06:43 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेस्ट इंडीज क्रिकेटची ऐशी की तैशी
Advertisement

क्रिकेटमध्ये एक जमाना असाही होता जिथे फक्त वेस्टइंडीज एके वेस्ट इंडिज आणि वेस्ट इंडिज दुणे वेस्ट इंडीजच असायचं. एवढा दबदबा किंबहुना मी तर म्हणेन एवढी दहशत त्यांनी क्रिकेट जगतावर निर्माण केली होती. 1981/82 मध्ये भारत विऊद्ध वेस्टइंडीज व भारत-ऑस्ट्रेलिया या सामन्यांचे आकाशवाणीवरून धावते समालोचन ऐकता ऐकता मी लहानाचा मोठा झालो. त्याकाळी सुशील दोशी हिंदीमध्ये तर अनंत सेटलवाड इंग्रजीमध्ये धावते समालोचन करत. माझ्या तीस वर्षातील क्रिकेटच्या समालोचनात सुशील दोशी यांचा हिंदीमध्ये तर मराठीमध्ये  कै. वि. वि. करमरकर यांचा फार मोठा प्रभाव माझ्यावर पडला होता. या दिग्गज समालोचकांबद्दल आपण नंतर बोलूच. 1975, 1979 चे सलग दोन विश्वविजेतेपद त्यांच्याकडे होते. हेन्स-ग्रीनीजसारखी सलामीची विश्वविख्यात जोडी त्यांच्याकडे होती. व्हिव रिचर्ड्ससारखा आक्रमक फलंदाज, लॉईडसारखा धूर्त कर्णधार. माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, मायकल होल्डिंगसारखा वेगवान तोफखाना फलंदाजांना खेळपट्टीवर जगणं मुश्किल करून सोडायचा. याअगोदर 1960 ते 1970 च्या दशकातील गॅरी सोबर्ससारख्या वलयांकित खेळाडूला कोण विसरणार. याच खेळाडूंनी खऱ्या अर्थाने विक्रमाची सुऊवात केली. विक्रम या शब्दाचा पाया यांनीच रचला. काऊंटी क्रिकेटमधील सलग सहा चेंडूवर सहा षटकार. आजही क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूचे प्रतीक म्हणून त्यांना मानलं जातं. भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर क्रिकेटमध्ये ज्यांच्या प्रेमात पडले होते तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून वेस्ट इंडीजचा रोहन कन्हाय होता. सुनील गावसकर त्याच्या इतके प्रेमात पडले होते की त्यांनी आपल्या मुलाचे नाव रोहन ठेवले होते.

Advertisement

असो. विंडीजने चालू विश्वचषक स्पर्धेत भारतापाठोपाठ सुपरएट मध्ये प्रवेश केला आहे. परंतु हाच संघ मागील काही वर्षात कधी तळ्यात तर कधी मळ्यात बघायला मिळतो. 1990 नंतर विंडीजला ग्रहण लागलं. त्यांचे फलंदाज, गोलंदाज सपशेल अपयशी ठरू लागलेत. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. 2012 मध्ये श्रीलंकेत टी-20 चा किताब त्यांनी जिंकला. श्रीलंकेविऊद्ध छोट्या धावसंख्येला त्यांनी छान रोखून धरलं होतं. परंतु पुन्हा त्यांच्यात मरगळ आली. झटपट क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट असो ते असले काय नसले काय, प्रतिस्पर्धी संघाला नसल्यासारखेच होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी 2016 मध्ये विश्वविजेतेपद मिळवलं. एवढं सर्व असून सुद्धा मागील काही वर्षात त्यांना आयसीसीच्या इव्हेंटमध्ये सहभागासाठी पात्रता फेरीला सामोरे जावे लागायचं. 2024 च्या या टी-20 विश्वचषक स्पर्धेत विंडीज संघ यजमान असल्यामुळेच त्यांचा प्रवेश पक्का झाला.

अर्थात त्यांच्या या पिछेहाटीला विंडीज क्रिकेटमधील अर्थकारणही तेवढेच जबाबदार होतं. बाकीच्या देशांचा तुलनात्मक विचार केला तर त्यांना मिळणारं मानधन हे  तुटपुंजेच होतं. काही वर्षांपूर्वी तर विंडीज क्रिकेट बोर्ड हे ढवळून निघालं होतं. आताच्या घडीला त्यांच्या चमुवर नजर टाकली तर त्यांची नावे घेतानाही आपण अडखळतो. एवढे नवखे खेळाडू विंडीज संघात आहेत. असो. विंडीजने काल परवा किवीला पराभूत करत सुपरएटचा प्रवेश पक्का केला. परंतु या प्रवेशानंतर यजमान विंडीजचा खरा कस सुपरएटमध्ये लागणार आहे. काही वर्षांपूर्वी ख्रिस गेल म्हणाला होता, आता आम्हाला झटपट क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये तेवढे स्वारस्य राहिले नाहीये. आम्हाला टी-20 मध्ये बादशहा बनायचे आहे. अर्थात या वक्तव्यावर बऱ्याच दिग्गज क्रिकेटपटूंनी नाराजी दर्शवली होती. असो. एकंदरीत काय विंडीजचा संघ या विश्वचषक स्पर्धेत फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन सर्वांना आश्चर्यचकित करतो का, हे बघणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.