मच्छेत ‘एक गाव एक होळी’ संकल्पना
ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय : झाडांची कत्तल वाचविण्यासाठी घेतला ऐतिहासिक निर्णय : सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन
वार्ताहर /किणये
होळी सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. या होळी सणाची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. होळी सणात विविध प्रकारची लाकडे जमा करून होळी पेटविण्याची परंपरा आहे. तसेच काही गावांमध्ये सावरीचे लाकूड आणून ते रोऊन होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे. विविध प्रकारच्या लाकडांची कत्तल होऊ नये. यासाठी मच्छे गावातील ग्रामस्थांनी गावात एक गाव एक होळी संकल्पना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लक्ष्मी मंदिर मच्छे येथे सोमवारी सायंकाळी ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. होळी सणानिमित्त अनेक गावांमध्ये झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने व झाडांची तोड होऊ नये यासाठी मच्छे गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन गावातील भावकाई मंदिरजवळ एकाच ठिकाणी एक गाव एक होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सावंत पाटील हे होते. मच्छे गावाचा विस्तार अलीकडे झपाट्याने वाढलेला आहे. गावात अनेक उपनगरे उदयास आलेली आहेत. गल्ल्यगल्ल्यांमध्ये दरवर्षी विविध प्रकारची लाकडे आणून होळी करण्याची परंपरा आहे. त्याला ग्रामस्थ पंच कमिटीने पूर्णपणे आळा घातलेला आहे. तसेच सर्व ग्रामस्थांनी गल्ला-गल्ल्यांमध्ये होळी साजरी करू नये तर गावच्यावतीने एकच ठिकाणी होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बैठकीमध्ये सुरेश लाड, संतोष जैनोजी, भरमा तळवार, गणपत चौगुले, बाळू कदम, बजरंग धामणेकर आदींनी विचार व्यक्त करून एक गाव एक होळी या संकल्पनेला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी शिवानंद बिद्री व दीपक माळवी यांनीही झाडांचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले तसेच मच्छे गावातील नागरिकांनी घेतलेला निर्णय इतर गावांसाठी आदर्श ठरणार आहे, असे सांगितले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुऊवार दि. 13 रोजी मच्छे गावातील भावकाई मंदिरसमोर पंच कमिटीच्यावतीने होळी उभारण्यात येणार आहे व सायंकाळी 5 वाजता पूजा करण्यात येणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.