Vari Pandharichi 2025: आषाढी वारीसाठी 1 हजार भजनी वीणांची निर्मिती
कारागीर मोठ्या संख्येने वीणा बनवून त्या पंढरपूरमध्ये विक्रीसाठी पाठवतात
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : तंतुवाद्यनिर्मितीसाठी जगभरात प्रसिध्द असणाऱ्या मिरजेतून आषाढी वारीसाठी एक हजारहून अधिक भजनी वीणा पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. वारीमध्ये देशभरातून आलेले कीर्तनकार, भजनी मंडळे मिरजेत बनविलेल्या भजनी वीणांनाच पसंती देतात. त्यामुळे दरवर्षी वारीच्या अगोदर येथील कारागीर मोठ्या संख्येने वीणा बनवून त्या पंढरपूरमध्ये विक्रीसाठी पाठवतात.
तंतूवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मिरजेत सतार, तानपुरे, वीणा अशी पारंपरिक तंतुवाद्ये बनविली जातात. दर्जेदार सतार आणि तानपुरा निर्मिती ही या शहराची खासियत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात भजनी वीणा बनविणारे गाव म्हणूनही या शहराची ओळख आहे.
भजन आणि कीर्तनांचे कार्यक्रम आता गावोगाव होऊ लागले आहेत. टिव्हीसारख्या माध्यमांतून कीर्तनकारांचे कार्यक्रम होत असल्याने कीर्तनांच्या कार्यक्रमांत वाढ झाली आहे. भजनी मंडळांची संख्याही वाढू लागली आहे. या कार्यक्रमांसाठी भजनी वीणांची आवश्यकता असते.
मिरजेत अशा भजनी वीणा तयार होतात. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी दरवर्षी येथून मोठ्या प्रमाणात भजनी वीणांची मागणी असते. वारीसाठी देशभरातून भाविक पंढरपूर येथे येत असतात. ते भजनी वीणा खरेदी करतात. पंढरपूरमध्ये विक्रीसाठी आलेल्या बहुतांशी भजनी वीणा या मिरजेत तयार होतात.