महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एक पाऊल दूर...

06:59 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टी-ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत धडक मारण्याची टीम इंडियाची कामगिरी लक्षणीय व क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच म्हटली  पाहिजे. याद्वारे मागच्या पराभवाचेही भारताने उट्टे काढले असून, कांगारूंपाठोपाठ साहेबांना दिलेला धक्का भारतीय संघाच्या वीजिगीषू वृत्तीचेच दर्शन घडवतो. आता वर्ल्ड कपपासून संघ केवळ एक पाऊल दूर आहे, असे म्हणता येईल. किंबहुना, अंतिम लढत आफ्रिकेसारख्या गुणवान संघाशी होणार असल्याने विजय गृहीत धरून चालणार नाही. या स्पर्धेचा विचार करता दोन्ही संघांनी केलेली कामगिरी सरसच म्हणावी लागेल. अमेरिका व वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या या खरेतर फलंदाजांचा कस पाहणाऱ्या. परंतु, अशा अवघड खेळपट्ट्यांवरही भारतीय संघाने केलेली कामगिरी ही कसदार या सदरातच मोडते. स्पर्धेत भारतीय संघ आत्तापर्यंत अपराजितच राहिला आहे. हा सिलसिला कायम राहणार की मागच्या वन डेप्रमाणे ऐन मोक्याच्या क्षणी आपला खेळ ढेपाळणार, याचे उत्तर आजच मिळू शकेल. तसे पाहिल्यास भारतीय संघ समतोल म्हणावा लागेल. फलंदाज, गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंचा संघात भरणा आहे. त्यामुळे सांघिक कामगिरीच्या बळावर आत्तापर्यंत इंडियाने येथवर यशस्वी मजल मारल्याचे दिसून येते. तरीही कर्णधार व सलामीवीर म्हणून रोहित शर्मा याने केलेली कामगिरी निर्णायक ठरते. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या बलाढ्या संघांविरोधातील त्याची वादळी खेळी पाहता दोन्ही सामने एकहाती सामने जिंकून देण्याचे श्रेय प्रामुख्याने त्यालाच द्यावे लागेल. कर्णधार म्हणूनही त्याने दाखवलेली कल्पकता अजोड होय. वन डे वर्ल्डनंतर टी ट्वेंटीमध्येही संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्याची त्याने केलेली किमया उल्लेखनीय होय. यादरम्यान गोलंदाज वापरण्याचे त्याचे टायमिंगही वाखाणण्याजोगे ठरते. विराट कोहली हा भारताचा सर्वांत अव्वल फलंदाज. आजवर देशासाठी त्याने खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. असे असले, तरी आपला हा हुकमाचा एक्का या स्पर्धेत संपूर्णपणे फेल गेल्याचे पहायला मिळते. ही तमाम चाहत्यांसाठी निराशाजनक बाब असली, तरी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची विराटमध्ये नक्कीच क्षमता आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. खरे तर अलीकडच्या काळात विराट हा वन डाउन पोझिशनला चांगला सेट झाला आहे. असे असताना त्याला सलामीला पाठविण्याची रणनीती काहीशी अतर्क्य व अनाकलनीय वाटते. अंतिम फेरीत विजयी संघच कायम ठेवण्याकडे आपला कल असू शकतो. परंतु, मागच्या वन डेमध्ये हाच पॅटर्न आपल्याला मारक ठरला होता, याचे विस्मरण होऊ नये. म्हणूनच शिवम दुबेऐवजी यशस्वी जैस्वालला खेळविण्याचे धारिष्ट्या आपण दाखवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसे धाडस दाखविल्यास विराटला वन डाउनला खेळणे शक्य होईल व संघावरही अतिरिक्त ताण येणार नाही, असे वाटते. ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांची कामगिरी चांगलीच म्हणावी लागेल. इंग्लंडविऊद्ध या दोघांनी केलेली फलंदाजी त्यांच्या लौकिकास साजेशीच ठरते. रवींद्र जडेजाला या वर्ल्ड कपवर फार प्रभाव पाडता आला नसला, तरी अष्टपैलू म्हणून त्याची उपस्थिती आवश्यक वाटते. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची फिरकीही अप्रतिमच. त्यांच्यातील ताळमेळ उत्तमच म्हणावा लागेल. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप हे कॉम्बिनेशन जबरदस्तच. बुमराह हे तर भारताचे प्रमुख अस्त्र होय. त्याने अख्ख्या वर्ल्ड कपमध्ये केलेल्या गोलंदाजीची भेदकता ही शब्दात वर्णिता येण्यासारखी नाही. अर्शदीप हा भारतीय संघाला मिळालेला नवा हिराच म्हणावा लागेल. त्याच्या गोलंदाजीतील विविधता, टप्पा, लय अफलातूनच. या दोघांकडून अंतिम सामन्यात अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. भारतीय संघ सर्वोत्कृष्ट असला, तरी त्यांच्यासमोर तितकाच उत्कृष्ट संघ आहे, हे नाकारता येत नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा क्रिकेटविश्वात नेहमीच तुल्यबळ संघ म्हणून ओळखला जातो. या संघाचा उल्लेख चोकर्स असा केला जात असला, तरी बऱ्याचदा नशिबाने त्यांचा घात केल्याचे इतिहास सांगतो. वन डे व टी ट्वेंटीच्या इतिहासात तब्बल 32 वर्षांनंतर हा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. वन डे व टी ट्वेंटी विश्वचषकाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत त्यांना तब्बल 6 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कधी पावसामुळे त्यांच्या हातातून सामना निसटला, तर कधी अन्य कुठल्या कारणाने. 1999 मध्ये तर आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच टाय झाली होती. क्लुसनरने जवळपास मॅच खेचून आणली होती. मात्र, मोक्याच्या वेळी डोनाल्डने केलेली चूक, ऑस्ट्रेलियाने रन आऊटची साधलेली संधी यामुळे आफ्रिकेचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. अनेक गुणवान खेळाडू असूनही आजवर आफ्रिकेचा संघ शापित गंधर्वासारखाच राहिला. हा इतिहास बदलण्याची संधी त्यांच्याकडे असेल. कर्णधार एडन मार्करम, क्विंटन डिकॉक, क्लासेन, मिलर, हेंड्रिक्स अशी मजबूत फलंदाजांची फळी त्यांच्याकडे आहे. शिवाय रबाडा, शम्सीसह केशव महाराजसारखे कसलेले गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत. आफ्रिकेनेही आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे सामना तोडीस तोड असेल. बव्हंशी भारताला पसंती दिली जात असेलही. परंतु, आफ्रिकेला कधीही गृहीत धरून चालणार नाही, हे लक्षात घ्यावे. याच आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचे वन डेतील 434 धावांचे आव्हानही पार केल्याचे जगाने पाहिले आहे. हा सामना आजही सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांपैकी एक मानला जातो. त्यामुळे भारतीय संघाला गाफील राहून चालणार नाही. कामगिरी उंचावण्याबरोबरच रणनीतीच्या पातळीवरही भारतीय संघाला अलर्ट रहावे लागेल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्माबरोबरच विराट कोहली व बुमराहचा कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. त्यामुळे अंतिम सामना जिंकून या चौघांना विजेतेपदाची अनमोल भेट देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न नक्कीच राहील. भारतीय संघाने आपले सर्वस्व पणाला लावावे व हा सामना खेचून आणावा, हीच तमाम क्रिकेटपटूंची अपेक्षा आहे. टीम इंडियाला त्याकरिता शुभेच्छा.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article