पेठ येथे एकाचा भोसकून खून
इस्लामपूर :
वाळवा तालुक्यातील पेठ येथे दोन भावांतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सचिन सुभाष लोंढे (37 रा. साठेनगर, पेठ) यांचा एकाने चाकूने भोसकून खून केला. दोन भावांचे भांडण सोडवण्याची मध्यस्थी सचिनच्या जीवावर बेतली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
संग्राम कमलाकर शिंदे (रा. साठेनगर, पेठ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पेठ येथील साठेनगर येथे शरद कमलाकर शिंदे व त्यांची बहिण ही घरी जात असताना संशयीत आरोपी संग्राम शिंदेने भाऊ शरद शिंदे यांच्यासमवेत भांडण काढून जोरजोराने शिवीगाळ सुरु केली. यावेळी सचिन लोंढे हे संग्राम व शरद यांच्यामधील भांडण सोडवण्याकरीता गेले. आरोपी संग्रामला त्याचा राग आला. तु आमच्या भावांच्या भांडणामध्ये यायचे नाही, असे म्हणत हातातील चाकूने सचिन लोंढे यांच्या छातीमध्ये भोकसले. यामध्ये लोंढे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत सचिन यांचा भाऊ राजेंद्र लोंढे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपी संग्राम याला अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक दीडवाघ करत आहेत.