For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून पाकचा एकतर्फी पराभव

06:53 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून पाकचा एकतर्फी पराभव
Advertisement

डेव्हिस चषक स्पर्धा : भारताला विश्व गट एकमध्ये स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील म्येथे रविवारी झालेल्या लढतीत भारताने यजमान पाकिस्तानचा 4-0 असा एकतर्फी फडशा पाडत या स्पर्धेच्या विश्व गट एक मधील आपले स्थान निश्चित केले. तब्बल 60 वर्षानंतर भारतीय डेव्हिस संघाने आपल्या पाकच्या ऐतिहासिक भेटीमध्ये झालेल्या या लढतीत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले. रविवारी भारताच्या युकी भांब्री आणि साकेत मायनेनी यांनी दुहेरीचा सामना जिंकला. तर भारताच्या निकी पुनाचाने या स्पर्धेत पर्दापणातच आपला विजय नोंदविला. भारतीय डेव्हिस संघाने तब्बल 60 वर्षांनंतर प्रथमच यावेळी पाकचा दौरा केला होता. या लढतीतील शनिवारी पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथन आणि बालाजी यांनी आपले एकेरीचे सामने जिंकून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. रविवारी खेळविण्यात आलेल्या पुरूष दुहेरीच्या सामन्यात युकी भांब्री आणि साकेत मायनेनी यांनी पाकच्या मुझमिल मुर्तझा आणि अकिल खान यांचे आव्हान 6-2, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत आपल्या संघाला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरी सामन्यात भारताच्या 28 वर्षीय निकी पुनाचाने पाकच्या मोहम्मद शोएबचा 6-3, 6-4 असा फडशा पाडला. भारताने पाकवर 4-0 अशी एकतर्फी आघाडी घेतल्यानंतर उभय संघातील परतीचा शेवटचा सामना खेळविला गेला नाही. या लढतीसाठी भारतीय संघाचे नेतृत्व बहिस्थ कर्णधार म्हणून झिशान अलीने सांभाळले होते. या लढतीवेळी पाककडून भारतीय संघातील खेळाडूंसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या लढतीसाठी पाक टेनिस फेडरेशनतर्फे सर्व व्यवस्था चोखपणे ठेवण्यात आल्याचे कर्णधार झिशान अलीने सांगितले. या विजमामुळे भारतीय डेव्हिस संघाने विश्व गट एक मध्ये स्थान मिळविले असून ही लढत येत्या सप्टेंबरमध्ये खेळविली जाणार आहे. तर पाकच्या संघाला गट 2 मध्ये रहावे लागणार आहे. उभय संघामध्ये आतापर्यंत 8 लढती झाल्या असून त्या सर्व भारताने जिंकल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.