चीनचा एकतर्फी पराभव, भारत उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / राजगीर (बिहार)
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत शनिवारच्या सामन्यात यजमान आणि विद्यमान विजेत्या भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बलाढ्या चीनचा 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.
या सामन्यात भारतातर्फे संगीता कुमारी आणि कर्णधार सलिमा टेटे यांनी दोन मैदानी गोल तर दिपीकाने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून स्पर्धेच्या गुणतालिकेत चार सामन्यांतून 8 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. आता चीन चार सामन्यांतून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सदर स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीने खेळविली जात असून एकूण 6 संघांचा समावेश आहे. राऊंड रॉबीन फेरी अखेर गुणतालिकेत पहिले चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेत भारतीय महिला संघातील खेळाडूंनी पहिल्या मिनिटांपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला. त्यामुळे चीनच्या बचाव फळीवर चांगलेच दडपण आले होते. या संपूर्ण सामन्यात चीनच्या हद्दीमध्ये अधिकवेळ चेंडू राहिला. सामन्यातील पहिल्याच मिनिटाला भारताला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉनर्स मिळाले. पण ते वाया गेले. त्यानंतर पाच मिनिटांच्या अंतराने शर्मिलादेवीच्या पासवर सुनेलिता टोपोने चीनच्या गोलपोस्टपर्यंत धडक मारली. पण त्यांना गोल करता आला नाही. सामन्यातील 15 मिनिटांच्या कालावधीत चीनला पेनल्टीकॉर्नर मिळाला. पण तो वाया गेला. या पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात दोन्ही संघाकडून काही चुका झाल्या. पण बरोबरी राखली होती. 21 व्या मिनिटाला भारताला दुसरा तर 26 मिनिटाला भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. चीनच्या गोलरक्षकाने भारताचे हे ल्ले थोपविल्याने मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ गोल शुन्य बरोबरीत राहिले.
सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर सुशिला चानुने दिलेल्या पासवर संगीता कुमारीने मैदानी गोल करुन भारताचे खाते उघडले. 37 व्या मिनिटाला कर्णधार सलिमा टेटेने ब्युटी डुंगडुंग आणि प्रिती दुबे यांच्या साथीने भारताचा दुसरा गोल केला. सामना संपन्यास केवळ काही सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि दिलीपकाने या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाचा तिसरा गोल नोंदवून चीनचे आव्हान संपुष्टात आणले. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या अन्य सामन्यात जपानने मलेशियाचा 2-1 असा पराभव केला. तर कोरियाने थायलंडचे आव्हान 4-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.