नाल्यावरील भराव वाहून गेल्याने वाहनधारकांना धोका : दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/धामणे
नागेनहट्टी ते नंदिहळ्ळी या रस्त्याला एक मोठा नाला असल्याने नाल्यालगतच्या मुख्य रस्त्याची एक बाजुच गेल्या पावसाळ्यात वाहून गेली असल्याने वाहन धारकांना धोका निर्माण झाला आहे. नागेनहट्टी ते नंदिहळ्ळी या मुख्य रस्त्याला नागेनहट्टीपासून दीड किलो मीटर अंतरावर एक मोठा नाला आहे. या नाल्यावर मोठे ब्रिज असून या ब्रिजचा दुतर्फा रस्त्याला घट्ट मुरुमची भरती घातली होती. परंतु गेल्या पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे या ब्रिज शेजारील रस्याच्या एका बाजुचा भराव पाहून गेला असून त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला असल्याची तक्रार या रस्त्यासंबंधीत शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचे नागेनहट्टी गावातील नागरिकांनी सांगितले. निदान आतातरी या समस्येकडे जातीने लक्ष पुरवून तातडीने ही समस्या दूर करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.