बाप्पांची पूजा नित्यनियमाने करावी
अध्याय सातवा
योगसाधना करून परब्रह्मात विलीन होणे हे मानवी जीवनाचे सर्वोच्च साध्य होय. ज्यांना हे शक्य होत नाही त्यांनी बाप्पांची नित्यनियमाने षोडपचार पूजा करून चित्तशुद्धी करून घ्यावी. पूजेने चित्त शुद्ध कसे होत जाते ह्यामागील मानसशास्त्राrय कारण पुढीलप्रमाणे आहे. माणसाच्या मनात चांगले, वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. त्यानुसार होणाऱ्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी त्याचे मन इंद्रियांकडून कर्म करून घेते. त्यातून त्याचे बरे, वाईट प्रारब्ध तयार होते आणि ते भोगण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होतो. या जन्मामध्ये प्रारब्धाचे भोग भोगत असताना एखाद्याच्या मनात जर बाप्पांचे सोडून इतर विचार आले नाहीत तर त्याचं चित्त स्वस्थ असतं. परिणामी त्याच्या हातून पापाचरण घडत नाही. म्हणून भक्ताने प्रारब्धाचे भोग भोगत असताना नित्यनेमाने बाप्पांची पूजा करत राहिल्यास, त्याच्या मनात सतत बाप्पांचेच विचार घोळत असतात. माणसाच्या मनात एकावेळी एकच विचार येत असल्याने तेथे वाईट विचारांना बिलकुल थारा मिळत नाही. जसजसे मनात वाईट विचार यायचे बंद होतात, तसतशी त्याची चित्तशुद्धी होत जाते.
ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्व साहित्यानिशी बाप्पांची षोडशोपचारे पूजा करावी. ज्यांना काही कारणाने साहित्य उपलब्ध होत नसेल, त्यांनी पान, फुल, फळ, पाणी इत्यादि जे काही उपलब्ध असेल ते बाप्पाना अर्पण करून त्यांची मनोभावे करुणा भाकावी. वेळेच्या अथवा साधनांच्या अभावी ज्यांना हेही शक्य होत नाही त्यांनी मानसपूजा करावी असे बाप्पा सध्या आपण अभ्यासत असलेल्या अथवा मानसीं पूजां कुर्वीत स्थिरचेतसा । अथवा फलपत्राद्यैऽ पुष्पमूलजलादिभिऽ । पूजयेन्मां प्रयत्नेन तत्तदिष्टं फलं लभेत् ।। 9 ।। त्रिविधास्वपि पूजासु श्रेयसी मानसी मता । साप्युत्तमा मता पूजानिच्छया या कृता मम ।। 10।। ह्या दोन श्लोकात सांगतात. तिन्ही प्रकारच्या पूजांमध्ये मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे असे बाप्पांचे मत आहे कारण इतर पूजा करताना मनात अन्य विचार येऊ शकतात पण मानसपूजा करताना भक्ताच्या मनात फक्त आणि फक्त बाप्पांचेच विचार येत असतात. त्यामुळे भक्ताचे चित्त पवित्र आणि निर्मल होऊन शुद्ध होते.
अशा प्रकारे पूजाविधी करत राहिल्याने उत्तरोत्तर बाप्पांच्यावर श्रद्धा वाढत जाऊन उपासनेद्वारा तो गणेशमय होऊन जातो. त्याला समाधीमार्गाने निर्गुण उपासनेच्या उंबरठ्यावर बाप्पा आणून सोडतात व पुढे यथाकाल त्याचा उध्दार होतो. म्हणून बाप्पांची मनोभावे पूजा नित्यनेमाने, अत्यंत श्रद्धेने आवर्जून करावी. हळूहळू त्यात चित्त स्थिर होत जाऊन कोणत्याही कारणाशिवाय होणारा सर्वश्रेष्ठ आनंदाचा प्रकार त्याला अनुभवायला मिळतो. अशा पूजेतील भक्ताचा भक्तिभाव पाहून बाप्पाही आनंदित होतात व भक्तावर कृपेचा वर्षाव करतात. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना होतं. बाप्पा भावाचे भुकेले असतात. याबद्दल एक कथा अशी सांगतात की, एकदा व्यास मुनींचे वडील पराशरमुनी चार वर्षाचे असताना मोरेश्वर क्षेत्रात गेले होते. ते बाप्पांचे भक्त होते तशातच त्यादिवशी गणेशचतुर्थी होती पण पराशरांच्या जवळ पुजासाहित्य नव्हते म्हणून त्यांनी भक्तिभावाने मातीच्या गणपतीची फुलपानांनी मनोभावे पूजा केली.
महानैवेद्यासाठी लागणारे मोदकही त्यांच्याजवळ नसल्याने तेही त्यांनी मातीचेच बनवले व मनोभावे बाप्पाना अर्पण केले. त्यांचा भक्तिभाव पाहून बाप्पांची मातीची मूर्ती सजीव झाली व मातीचे मोदकही खरेखुरे झाले आणि बाप्पांनी ते भक्षण केले. विशुद्ध भावनेनं केलेल्या पूजेची अशी प्रचिती येते.
क्रमश: