For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सद्गुरुना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा उपदेश घ्यावा

06:30 AM Feb 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
सद्गुरुना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा उपदेश घ्यावा
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. निष्काम कर्मयोगाच्या द्वारे मनुष्य संसारबंधनातून मुक्त होतो. सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा “ज्ञानयज्ञ” हा श्रेष्ठ आहे कारण सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात. त्यामुळे इतर यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत. ज्ञानयज्ञ हा चालू जन्माच्या कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे. जो ज्ञानयज्ञ करत असतो. त्याच्या मनात समोरच्याचे कल्याण व्हावे एव्हढा एकच हेतू असल्याने त्याचे मन स्वच्छ असते. तो त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने त्याच्या स्वभावातील त्रिगुणांचे प्राबल्य संपून जाते. त्याच्या मनात कोणतेही तर्कवितर्क येत नाहीत. इंद्रियजय साधला गेल्याने त्यांची सर्व इंद्रिये विषयसंग विसरून जातात. त्याच्या मनाचे मनपण संपून जाते, शब्दाची धाव थांबते. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन ब्रम्ह प्रत्यक्ष अनुभवास येते. सर्वत्र ब्रह्मदर्शन होत असल्याने इतर गोष्टींचे असणे निरर्थक होते. निरर्थक गोष्टीत चांगले, वाईट ठरवण्याची गरज नसते. त्यामुळे विवेकबुद्धीची गरज वाटत नाही. प्रत्येकजण वेगवेगळा न दिसता प्रत्येकातील आत्मस्वरूपाचे दर्शन त्याला घडू लागते. हा आपला तो परका असा भेद संपुष्टात येतो. इतकेच काय सर्व प्राण्यातील आत्मस्वरूप एकच असल्याचा साक्षात्कारही त्याला होऊ लागतो.

संत एकनाथांनी असा अनुभव घेतला असल्याने त्यांनी एकदा काशीहून आणलेली गंगेची कावड रामेश्वरला घेऊन जात असताना वाटेत कडक उन्हात तहानेने तडफडणारे गाढव दिसल्यावर त्याच्या मुखात ती सहजी रिती केली होती. अमुक एक काही मिळवावे अशी इच्छाच उरलेली नसल्याने त्यांना हे करताना बिलकुल वाईट वाटले नाही. सदैव दुसऱ्यासाठी आवश्यक ते करण्याचा स्वभाव तयार झाल्यावर, केव्हा काय करावे हे सुचवणाऱ्या विवेकबुद्धीचीही गरज संपलेली असते.

Advertisement

वरील सर्व वर्णन वाचून आपणही ज्ञानयज्ञाचे आचरण करून ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करावे आणि ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. त्यादृष्टीने तो कर्म करण्याची मनाची तयारीही करत असतो परंतु जेव्हा परीक्षेची वेळ येते त्यावेळी मनुष्य आत्मज्ञानी नसल्याने अर्जुनाप्रमाणे मोहग्रस्त होतो. अशावेळी प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार वागत असतो. अशाप्रकारे आचार आणि विचारामध्ये फरक पडत जातो. अर्थात भगवंतांना हे माहित आहेच म्हणून ते पुढील श्लोकात असा उपदेश करतात की माणसाने नुसते मनाने ठरवून त्याच्या हातून कर्मयोगाचे आचरण घडत नाही. त्यासाठी सद्गुरुंच्या कृपेची गरज असते. माणसाने सद्गुरुना साष्टांग नमस्कार करून, मनोभावे त्यांची सेवा करून, निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून आत्मज्ञान समजून घ्यावे. ते तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष ज्ञानाचा उपदेश करतील. दुसऱ्या अध्यायात अर्जुन शिष्यभावाने भगवंतांना शरण जाऊन म्हणतो की, प्राप्त परिस्थितीत मी गोंधळून गेलो आहे म्हणून माझे हित कशात आहे ते मला समजावून सांगा. ती हिताची गोष्ट ते येथे सांगत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.