फळाची अपेक्षा सोडून कर्मे करावीत
अध्याय तिसरा
भगवंत म्हणले, जगात थोर लोक जे कर्म करतात, ते धर्माला धरूनच असल्याची खात्री असल्याने सामान्य लोक त्यालाच धर्माचरण समजून त्याप्रमाणे वागतात. येथे जन्माला आलेल्याला कर्म हे करावेच लागते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. वास्तविक पाहता, मी काही केलेच पाहिजे असे नाही किंवा माझ्याजवळ नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, तरीपण मी कर्म करतो. पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्यासारखा दुसरा जगात कोणीही नाही तसेच सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्यात आहे पण मी आळसाने कर्म केले नाही तर तेच बरोबर आहे असे वाटून लोकही माझ्याप्रमाणे निक्रिय होतील आणि त्यांच्या नाशाला मीच कारणीभूत होईन. मी निरिच्छ आहे म्हणून आत्मस्थितीत शांतपणे बसून राहिलो, तर ही प्रजा भवसागरातून कशी बाहेर पडेल? प्रजेने माझ्या वागण्याकडे पहावे आणि आचरणाची पद्धत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे मी जर कर्माचा त्याग केला, तर लोकांचे जीवन सर्व प्रकारे बिघडून जाईल. म्हणून ह्या लोकी जो समर्थ आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे, त्याने तर कर्मत्याग अजिबात करू नये.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सामान्य माणसे कर्मफलाच्या ओढीने कर्मे करतात. तशाच ओढीने लोकसंग्रहांची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने फलाची आशा सोडून कर्मे करावीत.
गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याने मोकळेपणे । करावे कर्म तैसे चि इच्छुनी लोक-संग्रह ।।25।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, फळाच्या आशेने सकाम पुरुष जेवढ्या उत्साहाने कर्माचे आचरण करतो, तेवढ्या उत्साहाने फळाची आशा नसलेल्या पुरुषांनीही कर्मे केली पाहिजेत. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्ममार्गाचे आचरण करून त्यांनी सर्वांना सन्मार्ग दाखवावा आणि आपण सामान्य लोकांप्रमाणे राहून आपले जीवन घालवावे. त्यांच्यात मिळूनमिसळून रहावे, आपण कर्ममार्गाचे आचरण करतोय म्हणजे विशेष काही करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात ज्ञानी पुरुषाने कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. आपण स्वत: परमेश्वराशी एकरूप होऊन आपली कर्मे उत्तम प्रकारे करावीत आणि अज्ञानी लोकांकडूनही तशीच करवून घ्यावीत.
नेणत्या कर्म-निष्ठांचा बुद्धि-भेद करू नये । गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनि ती ।। 26।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, लहान बालक मोठ्या प्रयत्नाने आईचे दूध पिते, त्याला पक्वान्न कसे खाता येईल? म्हणून ती त्यांच्यासाठी नसतात. त्याप्रमाणे ज्यांना निष्काम कर्माचे महत्त्व समजलेले नाही. त्याच्यासाठी नैष्कर्म्यता नसते. त्यांच्यापुढे नैष्कर्म्यतेचे गोडवे गाऊ नयेत. तसे केल्यास त्यांना असे वाटेल की, जर फळाची अपेक्षा करायची नसेल तर कर्म तरी कशाला करा? म्हणून त्यांच्याजवळ सतकृत्याची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषाने त्याप्रमाणे आचरण करून दाखवावे. अशा सत्पुरुषाने लोकांच्या कल्याणासाठी जरी कर्मे केली, तरी त्याला कर्माचे बंधन लागत नाही. कसे ते सांगतो. समजा एक बहुरूपी आहे. त्याने जेव्हा राजा किंवा राणीचे सोंग घेतलेले असते. त्यावेळी त्याला आपण राजाचे सोंग घेतले म्हणजे पुरुष आहोत किंवा राणीचे सोंग घेतल्यामुळे स्त्राr आहोत असे वाटत नसते. त्याप्रमाणे लोक कल्याणासाठी निष्काम पुरुष जरी कर्म करीत असला, तरी आपण कर्ते नाही हे माहीत असल्याने, त्या कर्मातून त्याला पुण्याची अपेक्षा नसते आणि पापकर्म तो कधी करतच नाही. त्यामुळे त्याला त्या कर्माचे कोणतेही बंधन लागू होत नाही.
क्रमश: