कर्माचे फळ मिळेल ही इच्छा ठेवून कर्म करू नये
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, वेदांचा सखोल अर्थ लक्षात न घेता वेदांच्या शब्दश: अर्थ काढणाऱ्या लोकांच्या मनात कर्मफळाचा उपभोग घेण्याची दुर्बुद्धी वास करत असते. आपल्याला परमेश्वरस्वरूप प्राप्त व्हावे अशी इच्छा फार कमी लोकांना होत असते. ज्यांना ती होते त्यांना समोर दिसणाऱ्या विषयात गोडी वाटेनाशी होते. साहजिकच ते करत असलेल्या कर्माच्या फळात त्यांचे मन गुंतून पडत नाही. त्यामुळे निरपेक्षतेने कर्मे करण्याची सुबुद्धी त्यांना होते आणि त्याप्रमाणे वागून ते मोक्ष मिळवतात. जेव्हा सर्वत्र पाणीच पाणी दिसत असते त्यावेळी विहिरीतल्या पाण्याचे महत्त्व आपोआपच कमी होते. त्याप्रमाणे जे विज्ञानी ब्रह्मवेत्त असतात त्यांना वेद पूर्ण अवगत असल्याने वेदात काय सांगितलेले आहे हे त्यांना बरोबर समजते. ते वेदार्थाचा विचार करतात तेव्हा त्यातील रज, तम गुणांनी युक्त भागाकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि त्यातील सत्व गुणांनी युक्त असलेल्या शाश्वत परब्रम्हतत्वाचा ते स्विकार करतात आणि स्वधर्माचे पालन करून ते मोक्षसुखाचे धनी होतात.
पुढे भगवंत म्हणतात, अर्जुना माणसाने फक्त कर्म करावे, कर्मफळावर अधिकार सांगू नये. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छादेखील करू नकोस आणि त्याचबरोबर फळाची इच्छाच करायची नाही तर कर्म तरी कशाला करा असा विचार मनात आणणे निरर्थक आहे हे लक्षात घे कारण तुझा त्रिगुणयुक्त स्वभाव तुला स्वस्थ बसू देणार नाही.
ह्या आशयाचा गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा पुढील श्लोक सुप्रसिद्ध आहे.
कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी । नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ।। 47 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, या सर्व गोष्टींचा विचार करून पाहिले असता स्वकर्म करणेच उचित आहे. म्हणून आपले कर्तव्य कर्म कधीही सोडू नये. मात्र ते करताना करत असलेल्या कर्माचे फळ मिळेल ही इच्छा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करू नये.
ह्या श्लोकामध्ये दोन, तीन महत्त्वाच्या गोष्टी भगवंत अर्जुनाला निक्षून सांगत आहेत. त्यांचं सांगणं अगदी सुस्पष्ट आहे. ते सर्वप्रथम हे सांगतात की, आपल्याला ईश्वराने नेमून दिलेले कर्म कधी सोडू नये. ईश्वराने माणसाच्या स्वभावाला अनुकूल असे कर्म करायची प्रेरणा त्याला दिलेली असते. कदाचित एखाद्याला ते कर्म आवडत नसेल म्हणून ह्यापेक्षा दुसरे एखादे कर्म करून पाहू असे त्याच्या मनात येऊ शकते पण त्याने तसे न करता मिळालेले कर्म कर्तव्य म्हणून, स्वधर्म म्हणून पार पाडावे कारण तसे करणेच त्याच्या हिताचे असते.
भगवंत दुसरी गोष्ट अशी सांगतात की, अर्जुना कर्म केल्यावर मला अमुक एक फळ मिळेल अशी अपेक्षा, इच्छा बाळगू नकोस कारण कर्म केल्यावर तुला त्याचे फळ काय द्यायचे ते तुझे हित बघून ईश्वर ठरवत असतो. कदाचित ते फळ तुझ्या अपेक्षेप्रमाणे नसेल किंवा तुला हवे असलेले असले तरी तुझ्या अपेक्षेइतके नसेल. दोन्हीमुळे तुझा अपेक्षाभंग होईल आणि समजा ते तुला हवे असेल तसेच असले तरी त्यामुळे तुझ्या अपेक्षा वाढत जातील. हे मिळाले आता आणखीन मिळावे असे वाटत जाईल आणि ते तसे त्या प्रमाणात मिळाले नाही की, तुझा अपेक्षाभंग होईल. म्हणून फळाची अपेक्षा न करणे हे नेहमी चांगले असते. ईश्वर जे फळ देईल ते आनंदाने स्वीकारणे हेच हिताचे असते कारण मिळे तेचि करी गोड ही समाधानी राहण्याची गुरुकिल्ली आहे. तिसरी गोष्ट भगवंत सांगतात की, काही लोक निषिद्ध म्हणजे करू नये ते कर्म करण्यात गुंतलेले असतात तरी माणसाने तसे कधीही करू नये.
क्रमश:
