परमार्थात मन आणि बुद्धी सद्गुरुना अर्पण करायची असते
देव जशा पद्धतीने विचार करतो तशा पद्धतीने मनुष्य विचार करू लागला की, त्याची वागणूक नीतिशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होते. ह्यासाठी मनुष्य विचारांनी देवाशी जोडला जायला हवा. त्यालाच योग असे म्हणतात.
अध्यायाच्या सुरवातीला भगवंत म्हणाले, पार्था माझ्यावर तुझे प्रेम आहे पण तू मला अजून जाणलेले नाहीस. नुसते माझ्यावर प्रेम करून तू मला जाणू शकणार नाहीस त्यासाठी मी सांगितलेल्या योगाचे आचरण कर. विशेष म्हणजे मला जाणलेस की, पुढे काही जाणावयाचे शिल्लक उरत नाही.
प्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित । जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ।। 1 ।।
विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो। जे जाणूनि पुढे येथे जाणावेसे न
राहते ।।2 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, अरे तू आता योगज्ञानाने युक्त झाला आहेस. आता विज्ञान म्हणजे काय ते मी तुला सांगतो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे तुला समजलेले आहेच आता विज्ञान म्हणजे काय हे तुला समजले की, तळहातावर ठेवलेल्या रत्नाप्रमाणे तू मला जाणशील. जेव्हा मनुष्य तळहातावर एखादी वस्तू घेऊन पाहतो तेव्हा त्याला ती वस्तू अगदी स्पष्ट दिसते. माणसांना असे वाटत असते की, ज्याप्रमाणे व्यवहारातले ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीची गरज असते त्याप्रमाणे देवांना समजून घेण्यासाठीही बुद्धीची गरज असते. लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी भगवंत पुढे म्हणाले, ज्या माणसाला आपण कोण आहोत हे समजण्याची तळमळ लागलेली असते त्याला ते समजते त्यासाठी बुद्धीची गरज नसते. बुद्धी, विचार आणि तर्क ह्यांची गरज व्यवहारात यशस्वी होण्यासाठी लागते पण आपण कोण आहोत हे आत्मज्ञान झाले की, तो स्वस्थ होतो म्हणजे स्वरूपात मग्न होतो. विज्ञान म्हणजे मी मांडलेला विश्वाचा पसारा होय. हे विश्व हा माझा प्रपंच आहे असे म्हणलास तरी चालेल. लोक ह्याला खरा समजतात हेच अज्ञान होय.
भगवंतांना असं म्हणायचं आहे की, बुद्धी, विचार आणि तर्क ह्या गोष्टी जगाचे व्यवहार करायला उपयोगी पडतात पण परमार्थसाधना करण्यासाठी ह्यांची गरज नसते. जो सद्गुरूंच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करतो, त्याची परमार्थसाधना कडेपर्यंत जाते. म्हणून परमार्थात मन आणि बुद्धी ईश्वराला किंवा त्याचे सगुण रूप असलेल्या सद्गुरुंना अर्पण करून पुढे जायचे असते. मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केल्यावर मनात येणाऱ्या विचारांना किंवा बुद्धीने केलेल्या तर्कांना वाव नसल्याने ईश्वराला जाणून घेण्यासाठी मन, बुद्धी, विचार, तर्क ह्यांची गरज नसते.
भगवंत पुढे म्हणाले की, मनुष्य जोपर्यंत प्रपंच खरा आहे असे वाटत असते तोपर्यंत तो अज्ञानी आहे असे समज. आता जे मी सांगणार आहे त्यामुळे प्रपंच खरा आहे हे अज्ञान संपूर्ण नाहीसे होऊन प्रपंच मिथ्या आहे हे लक्षात येईल. समोर दिसत असले तरी काही काळाने जे नाश पावते त्याला मिथ्या असे म्हणतात. हे लक्षात घेणाऱ्या माणसाचे संपूर्ण लक्ष जेव्हा त्याच्या आत्मस्वरुपाकडे लागते तेव्हा त्याला प्रपंचाचा विसर पडून तो स्वत:च आत्मस्वरूप होतो.
क्रमश: