गावठी बॉम्ब बनवताना स्फोट होऊन एक गंभीर जखमी
मुळदे - तळपवाडी येथील घटनेने खळबळ
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग ( ५० ) हे आपल्या घरा शेजारील बंद पोल्ट्री वजा मांगरात गावठी बॉम्ब बनवित असताना शुक्रवारी सायंकाळी बॉम्बचा स्फोट होऊन संतोष मासंग हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शेतकऱ्यावर तात्काळ कुडाळ रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. कदम व सहकारी घटनास्थळी उपस्थित होते.ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला आणि एकच खळबळ उडाली. या गावठी बॉम्ब स्फोटामुळे मुळदेत गावठी बॉम्ब तयार होत असल्याची माहिती पुढे आली आहे. रान डुक्कर व अन्य वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी शेतात तसेच जंगलात हे बॉम्ब पेरले जातात. शिकाऱ्यांचे मोठे रॅकेट या भागात कार्यरत आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.