बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी एकास जन्मठेप
इस्लामपूर :
शिराळा तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी जयवंत उर्फ बाबज्या रामा शिरसट (रा.शिरसटवाडी) यास न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा न्यायाधिश अनिरुध्द वाय. थत्ते यांनी हा निकाल दिला.
शिरसट हा संभाजी सखाराम शिरसट यांच्या शेतात कामास होता. दि.१७ जून २०२४ रोजी सायंकाळी काम संपवून संभाजी व जयवंत हे घरी जात असताना दुचाकी पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी ते पिडीत मुलीच्या आजोबाकडे आले होते. दरम्यान जयवंत हा लघुशंकेच्या निमित्ताने बाजूला गेला. दरम्यान पिडीत मुलगी ही चुलत्यांच्या घरी त्यांच्या लहान मुलाबरोबर खेळत होती. जयवंत याने तिला हाताने इशारा करुन बोलावून घेतले. तिच्या पाठोपाठ ते लहान मुल ही गेले. जयवंत याने पिडीतेस त्या लहान मुलास घरी सोडून येण्यास सांगितले. हे सर्व बोलणे पिडीत मुलीची चुलती स्वयंपाक करत असताना ऐकत होती. तिला शंका आल्याने ती बाहेर आली असता आरोपी जयवंत हा त्या मुलीस काही अंतरावरील निरगुडीच्या झुडुपाच्या आडोशास नेवून तिच्याशी अश्लिल चाळे करत होता. हा प्रकार पाहून मुलीची चुलती त्यास शिव्या देत धावली. त्यावेळी त्याने या मुलीस सोडून देवून पळ काढला. दरम्यान आजूबाजूचे लोक जमा झाले. तो पर्यंत कुणालाच संबंधीत आरोपीची ओळख नव्हती. पंक्चर काढत असणाऱ्या संभाजी शिरसट याच्याकडून त्याचे नाव व गाव समजले. या प्रकरणी मुलीच्या चुलतीने कोकरूड पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलीसांनी तपास करुन जयवंत शिरसट याच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधिश थत्ते यांच्या समोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅङ रणजीत एस पाटील यांनी काम पाहिले. पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादीसह पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, जन्म-मृत्यू निबंधक व तपासी अंमलदार पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायाधिश थत्ते यांनी जयवंत यास दोषी धरुन जन्मठेपीची शिक्षा सुनावली. ४० हजार रुपयांचा दंड केला आहे. त्यातील ३५ हजार पिडीत मुलीस देण्याचे आदेश केले आहेत. या खटल्या दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवलदार उत्तम शिंदे, कॉन्स्टेबल बजरंग खराडे यांचे सहकार्य लाभले.
- पिडीत मुलीचा जबाब निजी कक्षात
खटल्या दरम्यान न्यायाधिश थत्ते यांनी पिडीत मुलीचा जबाब निजी कक्षात घेतला. आरोपीची ओळख दाखवण्याकरता मुलीला आरोपीचा चेहरा व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे दाखवण्यात आला. त्याचा चेहरा पाहताच पिडीतेने दचकून स्क्रीनच्या मागे जावून रडायला सुरुवात केली.