विनयभंगप्रकरणी एकास 2 वर्षे शिक्षा
वडूज :
बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी खटाव तालुक्यातील आरोपी अजय पोपट कुकले यास दोन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी, की 15 मे 2019 रोजी आरोपी अजय पोपट कुकले याने फिर्यादीची मुलगी पीडिता (वय चार वर्षे चार महिने) हिचे तोंड दाबून धरले आणि विनयभंग केला. या गुह्यातील तपासी अधिकारी ए. डी. हंचाटे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले. कसून तपास करून आरोपींविरूद्ध वडूज जिल्हा सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता आर. डी. खोत यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला दोषी ठरवून खटाव तालुक्यातील अजय पोपट कुकले यास पोक्सो कलम 12 नुसार दोन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
खटला चालवण्या कामी सरकारी वकील, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. दया ढोले, दत्तात्रय जाधव, विजयालक्ष्मी दडस, अमीर शिकलगार, जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.