Miraj Crime | दारूच्या बाटलीवरून 'बार'मध्ये रक्तरंजित थरार! किरकोळ वादातून एकाचे नाकाचे हाड फोडले, सांगलीतील घटना
मिरज तालुक्यात बारमधील वाद हिंसक वळण
सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ रस्त्यावरील एका बिअर बारमध्ये दारुच्या बाटलीवरून झालेला किरकोळ बाद थेट रक्तरंजित मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "नेलेली बाटलीचे पैसे भर," एवढे सांगितल्याचा राग मनात धरून संशयिताने एका व्यक्तीस बारच्या बाहेर ओढत नेऊन बेदम मारहाण
केली.
या हल्ल्यात जखमीच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी जखमी अनिल उर्फ सुनिल सुरेश पाटील (वय ५१, रा. किसान चौक, कर्नाळ, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित ऋषिकेश संजय ठोंबरे (रा. किसान चौक, कर्नाळ) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिल पाटील हे कर्नाळ रस्त्यावरील एका बिअर बारमध्ये मद्यपानासाठी गेले होते. ते एका टेबलावर बसले असताना संशयित ऋषिकेश ठोंबरे बारमध्ये आला. त्याने पाटील यांच्या टेबलावरील दारुची बाटली उचलून नेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जवळपास तासाभराने ठोंबरे पुन्हा बारमध्ये परतला. त्यावेळी पाटील यांनी "मागे नेलेल्या बाटलीचे पैसे बारमालकाला दे," असे सांगितले.
या बोलण्याचा संताप आल्याने ठोंबरे याने पाटील यांना बारच्या बाहेर नेले आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. जोरदार मारहाणीत पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. घटनेनंतर बार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.