शिवशंकर पतसंस्था अपहार प्रकरणी एकास पोलीस कोठडी
कराड :
शिवशंकर पतसंस्थेतील अपहारप्रकरणी कराड शहर पोलिसांनी गजाआड केलेल्या शंकर मनोहर स्वामी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या संशयित महिला कर्मचाऱ्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी नऱ्हे (आंबेगाव, पुणे) परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शंकर स्वामी या संशयिताला बुधवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यास रात्री आठच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीनंतर त्यास अटक करण्यात आली आणि गुरूवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अजूनही पाच संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2022 या कालावधीत सर्व संचालक व काही कर्मचारी यांनी खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे हेतूपरस्पर नियमबाह्य कर्ज संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यामध्ये वाटप केले आहे. त्याद्वारे 13 कोटी 9 लाख 96 हजार 722 रुपयांच्या ठेवी गिळंकृत करत अपहार केल्याप्रकरणी 15 एप्रिल 2024 रोजी धनंजय चंद्रकांत गाडे या विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन अधिकार्यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर याप्रकरणी आजवर 11 जणांना अटक करण्यात आली असून सहा संशयितांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे.