सांतइनेज येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू
पणजी : सांतइनेज येथील आपटेश्वर सिद्धिविनायक मंदिराच्या मागे असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पणजी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला व घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडून मृत झालेल्या युवकाचे नाव साईवैभव वायंगणकर (27, सांताक्रूझ) असे आहे. ही घटना शुक्रवार 23 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे. येथील आप्टेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या तलावात पाच युवक आंघोळीसाठी आले होते. दरम्यान, त्यातील एक युवक तलावात बुडाला. त्या युवकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या युवकाने तलावात उडी मारली आणि बुडणाऱ्याला सुखरूप बाहेर काढले. मात्र वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाचविलेल्या युवकाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तर मृत झालेल्या युवकाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजय कुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिस पुढील तपास करीत आहेत.