पोलिसांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी पाण्याच्या वादावरून दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये संघर्ष उफाळून आला .
Dehradun Violence डेहराडुनच्या हिंसाचाराच्या घटनेत एकाचा मृत्य, तिघे गंभीर जखमी
उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील बैरागीवाला गावात शनिवारी हिंसाचाराची घटना घडून आली. या घटनने डेहराडूनमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी पाण्याच्या वादाला या घटनेचे कारण म्हटले असले तरी, मृताच्या कुटुंबीयांनी पैशांच्या वादाला कारण म्हणून सांगितले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, शनिवारी झालेला हा वाद दोन गटांमधील मतभेदानंतर दगडफेक, जाळपोळ आणि प्रत्युत्तरादाखल झालेल्या हिंसाचारात बदलला.
पोलिसांची कारवाई
तीन आरोपी आणि २५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने आरोपींच्या घरांना लक्ष्य करून एक घर पेटवून दिल्याच्या आरोपानंतर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका आरोपीचे निवासस्थानही पाडण्यात आले.
बैरागीवाला येथील रहिवासी अशोक कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मृताचे कुटुंब आणि शेजारील शेतकरी यांच्यात सिंचनाच्या पाण्यावरून सुरू असलेला वाद हे या भांडणाचे कारण होते. तक्रारदाराने आरोप केला आहे की, शनिवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता, तो शेतकरी काठ्या आणि हातोडे घेऊन ३५-४० जणांना सोबत घेऊन पीडितेच्या घरी आला आणि त्याने कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला.
एफआयआरनुसार, हल्ल्यात पीडित व्यक्तीला प्राणघातक दुखापत झाली. त्याच्या मृत्यूनंतर, आंदोलकांच्या एका गटाने बैरागीवाला येथील मुख्य संशयिताच्या घराला आग लावल्याचा आरोप आहे. यानंतर, “कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये” यासाठी परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) प्रमेंद्र दोभाल यांनी सांगितले.
दरम्यान, मयताच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, पूर्वी झालेल्या एका वादातून उद्भवलेल्या पैशांच्या वादादरम्यान हल्ला झाल्यानंतर त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली.
तणावपूर्ण परिस्थिती
“मी तिथे नव्हतो. त्यावेळी खरंतर कोणतंही भांडण झालं नव्हतं. पैशांबद्दलचं बोलणं आदल्या दिवशी झालं होतं. त्या मुलाकडे १४,००० रुपये होते . त्याने कालच पैसे मागितले असावेत. आज जेव्हा त्याने पैसे दिले, तेव्हा त्याची हत्या करण्यात आली,” असे वडिलांनी एएनआयला सांगितले. “जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही मृतदेह इथून हलवणार नाही,” असेही ते पुढे म्हणाले.
देहराडूनचे एसपी (गुन्हे) जितेंद्र चौधरी यांनी सांगितले की, पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. “कुटुंबियांनी दाखल केलेल्या औपचारिक तक्रारीच्या आधारे आम्ही सध्या गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. यासाठी स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत,” असे एसपी चौधरी यांनी सांगितल्याचे एएनआयने म्हटले आहे.