रत्नागिरीत एसटीखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू, चालकाविरूद्ध गुन्हा दाखल
कमलाकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालय येथे दाखल केले
रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती एसटी बसस्थानक येथे बसखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास घडली. कमलाकर बाबाजी चव्हाण (82, रा. जुवे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त अशा मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. या नूतन बसस्थानकातच वृद्धाचा बसखाली चिरडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहर पोलिसांनी या प्रकरणी एसटी चालक बापू आखाडे (55, रा. जाकादेवी ता. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कमलाकर चव्हाण हे 13 मे रोजी काही कामानिमित्त रत्नागिरीत आले होते. सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास ते मेडिकलमधून औषधे खरेदी करुन घरी जाण्यासाठी एसटी बसस्थानकात येत होते. यावेळी बसस्थानकात येणाऱ्या एसटीने (एमएच 14 बीटी 2757) कमलाकर यांना समोरुन जोराची धडक दिली.
यामुळे कमलाकर हे एसटीच्या मागील चाकाखाली आले. एसटीचे मागील चाक कमलाकर यांच्या दोन्ही पायावरुन गेल्याने त्यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. कमलाकर यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एसटी चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.