ज्ञानी भक्त होण्यासाठी खडतर वाटचाल करावी लागते
आत्मज्ञानी भक्त भगवंतांकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ प्रेमापोटी त्यांची भक्ती करत असतो. तो त्यांच्यापेक्षा वेगळा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो वेगळा नसतो. ‘मीच ब्रह्म’ अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी त्यांना केव्हाच मिळालेला असतो त्यामुळे भगवंत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. विशेष म्हणजे आर्त, जिज्ञासू आणि द्रव्याची अपेक्षा करणाऱ्या इतर तीन प्रकारच्या भक्तांना जरी भगवंताकडून भक्तीच्या बदल्यात काही अपेक्षा असल्या तरी ते देखील त्यांचे आवडते असतात.
ज्ञानी भक्त हा भगवंताचा आत्मा असतो. ह्या अर्थाचा उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चि की स्वये । जोडला स्थिर माझ्यात गति अंतिम पाहुनी ।।18 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, तो भगवंतांना जाणून समोर दिसणाऱ्या प्रपंचातील सुखांच्या मोहात न अडकता त्यांची भक्ती करून, त्यांच्यासारखाच झालेला असतो. तीच त्याची अंतिम गती असल्याने, तो पुन्हा प्रपंचाचे नाव काढत नाही. बरोबरच आहे ज्याने एकदा अमृताची चव चाखली आहे तो उसाच्या रसाकडे कशाला पाहिल? हा ज्ञानी भक्त भगवंताचा जीव की, प्राण असतो ह्यात काय नवल?
माऊली पुढं म्हणले, खरं म्हणजे ह्या सांगायच्या गोष्टी नव्हेत पण आता प्रसंगाने चर्चा निघाली आहे म्हणून बोललो. खर तर भक्ताच्या बाबतीत भगवंत आईच्या भूमिकेत असतात. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असते. त्याला काही दुखलं खुपलं की, तिचा जीव कासावीस होतो. तसंच भगवंताचं आहे. ज्ञानी भक्तावर त्यांचं अतोनात प्रेम असतं.
पुढील श्लोकात ज्ञानी भक्त इथपर्यंत येण्यासाठी किती कष्ट उपसतो, त्याला त्या कष्टांचे त्याला फळ काय मिळते इत्यादि गोष्टी भगवंत समजावून सांगत आहेत.
अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति । विश्व देखे वासुदेव संत तो बहु
दुर्लभ ।। 19।।
श्लोकाच्या विवरणात माउली ज्ञानी भक्त होण्यासाठी तो किती खडतर वाटचाल करतो ते सांगत आहेत. ते म्हणाले, त्याला इथपर्यंत येण्यासाठी विषयाच्या दाट झाडीत लपलेल्या काम, क्रोध इत्यादि विकारांचा सामना करावा लागतो. आहे त्या परिस्थितीत समाधानी राहून तो त्यांच्यावर मात करतो. सर्वसामान्य माणसाला नेहमी स्वार्थी वासना होत असतात आणि त्या तृप्त करण्यासाठी तो धडपडत असतो आणि त्यापायी कित्येकवेळा तो कितीतरी खालच्या पायरीवर बेलाशक उतरतो. पण ज्याला ज्ञानी भक्त व्हायचं आहे त्याला ह्यातील धोका माहित असल्याने तो स्वार्थी वासनांना मागे टाकून सदवासनेचा पहाड चढायला सुरवात करतो. स्वार्थी वासना टाळून, मनात सद्वासना निर्माण करणे हे एखाद्या पहाडावर चढाई करण्याइतके अवघड आहे असं माउली इथं सांगतायत. एकवेळ टेकडी, डोंगर चढायला सोपे कारण त्यावर असलेल्या झाडाझुडपाचा माणसाला आधार घेता येतो पण पहाडावर चढताना काळ्याकभिन्न दगडावर कशाचाच आधार मिळत नाही, तशातच आजूबाजूच्या स्वार्थी लोकांचे उदाहरण त्याच्यापुढे असते त्यामुळे आपणही स्वार्थीपणा करावा अशी इच्छा त्याला होते.