सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीकडे वाटचाल होते
अध्याय नववा
सगुण आणि निर्गुण उपासनेबद्दल बाप्पा बोलत आहेत. ते म्हणतात, त्यातही सगुणोपासना करणारे मला जास्त प्रिय आहेत. माझ्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करणारे मला प्रिय आहेत तसेच अनन्यतेने मला भजणारे भक्त मला आवडतात. असे भक्त मला हृदयात स्थापन करून माझी भक्ती करतात. अशी निर्गुण उपासना करणारे इंद्रिये आपल्या ताब्यात घेतात, सर्व भूतांचे हित करतात व माझ्या शिकवणुकीनुसार चालत असतात. ह्या अर्थाचे यो मां मूर्तिधरं भक्त्यामद्भक्तऽ परिसेवते । स मे मान्योऽ नन्यभक्तिर्नियुज्य हृदयं मयि ।।3।। खगणं स्ववशं कृत्वाखिलभूतहितार्थकृत्।ध्येयमक्षरमव्यत्तं सर्वगं कूटगं स्थिरम् ।। 4।। सोऽपि मामेत्यनिर्देश्यं मत्परो य उपासते । संसारसागरादस्मादुद्धरामि तमप्यहम् ।।5।। हे श्लोक आपण अभ्यासत आहोत.
बाप्पांची सगुणोपासना करणं त्यांची निर्गुणोपासना करण्यापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या सोपं असतं. कारण निर्गुण रूप डोळ्यांना दिसत नाही, मनाला अनुभवता येत नाही आणि बुद्धीलाही त्याचे आकलन होत नाही. ती कठीण आणि क्लेशदायक असते असं म्हणायचं कारण म्हणजे इंद्रिये स्वभावत:च बहिर्मुख व विषयासक्त असतात. ती माणसाला विषयाकडे फरफटत नेत असतात. इंद्रियांचे संयमन करण्यात माणसाला काही प्रमाणात यश मिळाले तरी मन कल्पनेने विषयांचाच विचार करत असते. तसेच माणसाचा अहंकार माणसाचा घात करण्यास टपलेला असतो. डोळ्यासमोर विषय दिसत असताना विवेकाने त्यातील मिथ्यत्व जाणणे फार अवघड असते. निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने हळूहळू मनुष्य निर्गुण उपासनेत यश मिळवू शकतो.
जे निर्गुणोपासना करत असतात ते पूर्वी सगुण उपासना करूनच पुढे आलेले असतात. हा प्रवास अनेक जन्मांचा असू शकतो. ह्या प्रवासाच्या शेवटी भक्ताला ईश्वर भेटीची तळमळ लागते ती लागण्यासाठी समोर दिसणाऱ्या जगाची आस पूर्णपणे सुटलेली असायला हवी. मागचे सुटले आहे आणि पुढचे मिळायचे आहे ह्या कालावधीत मनाची जी घालमेल होते त्याला तळमळ म्हणतात. व्यवहारातील गोष्टींसाठी अशी तळमळ लागून बऱ्याचवेळा आपली घालमेल होत असते पण ज्याची ईश्वरप्राप्तीसाठी अशी घालमेल होते तो धन्य होतो कारण त्याला ईश्वराशिवाय अन्य काहीच नको असते. म्हणजेच त्याने ईश्वराशी अनन्यता साधलेली असते. त्याने हृदयात ईश्वराची स्थापना केलेली असते. तो केवळ ईश्वरासाठी जगत असतो. जे निर्गुण उपासना करतात त्यांच्या मनात संसाराविषयी नावड उपजतच निर्माण झालेली असते. त्यामुळे ते प्रथम पासूनच याच्यामागे असतात. त्यामागे त्यांच्या पूर्वजन्मी केलेल्या सगुणोपासनेचे पुण्य उभे असते. म्हणून माणसाने सगुणोपासनेने सुरवात करावी. सगुणोपासनेत आपल्या आवडीच्या दैवताची सर्वांग सुंदर मूर्ती डोळ्यासमोर उभी असते. तिला साग्रसंगीत अलंकार घातलेले असतात. तिची षोडशोपचारे पूजा केलेली असल्याने ती अधिकच मनमोहक दिसत असते. साहजिकच अशी मूर्ती बघितली की, भक्ताची मूर्तीशी एकतानता होते. त्याचे अष्ट सात्विक भाव दाटून येतात. यात, स्वेद (घाम), स्तंभ (एकाच जागी थिजून जाणे), रोमांच (अंगावर काटा उभा राहणे), स्वरभंग (आवाजात बदल होणे), कंप (शरीराला कंप फुटणे), वैवर्ण्य (चेहऱ्याचा रंग बदलणे), अश्रू (डोळे भरून येणे) आणि प्रलय (मूर्च्छित होणे) यांचा समावेश होतो. भक्ताला त्याच्या एकतानतेच्या प्रमाणात वरीलपैकी काही किंवा सर्व भावांची अनुभूती येते. अशी सगुणोपासना बहुतेकजण ईश्वराच्या मूर्तीशी तल्लीन होऊन करतात. सगुणोपासनेतून त्याला ईश्वराशिवाय इतर गोष्टी गौण वाटू लागतात. मग इंद्रियांनी कितीही प्रलोभने दाखवली तरी त्याला त्याची काहीही किंमत वाटत नाही.
क्रमश: