अवघ्या महिनाभराच्या बाळाची 1.20 लाखांत विक्री; छत्रपती संभाजीनगरात आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; 7 आरोपी अटकेत
छत्रपती संभाजीनगर : अवघ्या एक महिन्याच्या बाळाची 1 लाख 20 हजार रुपयांना विक्री करून त्यातून महागडे स्मार्टफोन आणि सोन्याचे दागिने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी बाळाची विक्री करणाऱ्या जन्मदात्यांसह आंतरराज्यीय साखळीतील सात आरोपींना अटक केली आहे. हैदराबाद येथून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली असून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला एका संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्याला 5 जुलै रोजी मुलगा झाला. आर्थिक परिस्थिती आणि दारूच्या व्यसनामुळे या दाम्पत्याने बाळाची विक्री केल्याचा आरोप आहे. 7 ऑगस्ट रोजी कौशल्या पवार आणि तिची मुलगी सीमा रेशवाल यांनी 1.20 लाख रुपये देऊन बाळाचा ताबा घेतला.
त्यानंतर सीमा रेशवालने हे बाळ संगीता आव्हाड हिला 2 लाख 70 हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले. पुढे संगीता आव्हाडने नांदेडमार्गे स्वतःला डॉक्टर सांगणाऱ्या सुरेश राजाराम गुंटुका याच्या मदतीने बाळाला हैदराबादमधील उमा गंगाधर खटकमे हिच्याकडे 3 लाख 50 हजार रुपयांना विकल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे अवघ्या 48 तासांत बाळाची अनेक व्यक्तींकडून खरेदी-विक्री होत ते तेलंगणात पोहोचले.
या प्रकरणात कौशल्या पवार, सीमा रेशवाल, संगीता आव्हाड, गुंटूक व संगीता, सुरेश राजाराम गुंटुका आणि उमा गंगाधर खटकमे यांच्यासह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी तपास करत बाळाचा शोध घेतला आणि हैदराबादमधून त्याची सुरक्षित सुटका केली. 24 सप्टेंबर रोजी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बाळाच्या खरेदी-विक्रीची साखळी आणि अन्य संबंधित व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.