वाहनांचा विमा उतरवण्यासाठी महिन्याची मुदत
गुदिन्हो यांचे स्पष्टीकरण : ए आय कॅमेरे दंडासाठी नव्हे, शिस्तीसाठी
त. भा. प्रतिनिधी
वास्को : गोव्यात एआय कॅमेऱ्यांची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाहतुकीवर नियंत्रण असावे, वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळावी व अपघाती मृत्यूंना आळा बसावा या हेतूनेच एआय कॅमेरे तैनात करण्यात आलेले असून केवळ दंड वसूल करणे हा सरकारचा हेतू नाही, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे. वाहनांचा विमा उतरवणे आवश्यक असून या कामासाठी वाहनचालकांना एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी जाहीर केले आहे.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारची ए आय कॅमेरे बसवण्याची योजना का महत्वाची आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. वाहतुकीत शिस्त यायला हवी हाच कॅमेऱ्यांचा हेतू आहे. बरेच वाहनचालक वाहनांचा विमा न उतरवताच वाहने चालवत असतात. हे प्रकार खूप धोकादायक आहेत. असे चालक स्वत:बरोबर कुटुंबीयांनाही संकटात टाकत असतात. प्रत्येक चालकाने विमा काढावा व त्यासाठी महिनाभराची आणखी मुदत सरकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत विम्याच्या प्रश्नावर कोणालाही दंड दिला जाणार नसल्याचे ते म्हणाले.