मरावे परी देहऊपी उरावे !
मरावे परी कीर्तिरूपे उरावे... संतश्रेष्ठ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोकातील एक अतिशय सुंदर उदाहरण आज संपूर्ण देशभरात वापरले जाते. या उक्तीद्वारे माणूस शरीराने नश्वर असला तरी देखील तो सत्कर्मांद्वारा कीर्ती मागे ठेवत असतो. मरणानंतर देखील तो अनेकांच्या लक्षात राहतो आणि चांगल्या कार्याद्वारे चिरंतन स्मरणात राहतो. आजच्या आधुनिक काळामध्ये या उक्तीमध्ये थोडासा सकारात्मक आणखी एक बदल करता येतो तो म्हणजे ‘मरावे परी देहऊपी उरावे’ यामागील अतिशय चांगल्या भावना आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. एका माणसाच्या मरणानंतर त्याच्या देहाचा योग्य वापर केल्यास सातजणांना तो जीवदान देऊ शकतो आणि काहीजणांना त्यांचे आयुष्य जगण्यास व सुधारण्यास देखील मदत करू शकतो. म्हणूनच अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते.
सांगण्याचा उद्देश एवढाच की अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निवाडा, इच्छामरणासंदर्भात दिला. इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे सन्मानाने मरण्याचा हक्कही आता माणसाला प्राप्त झालेला आहे. हरीश राणा नामक एका बी. टेक. विद्यार्थ्याचा अपघात तेरा वर्षांपूर्वी होतो आणि या अपघातात तो वाचतो, परंतु त्याच्या डोक्याला एवढा गंभीर मार बसला होता की त्यामुळे त्याचे जवळपास बहुतांश शरीर लुळे पडल्यासारखे होते आणि तो कोमात गेला. तो इस्पितळात गेली तेरा वर्षे उपचार घेत आहे, तो त्यातून बरा होऊ शकत नाही. याचे निदान डॉक्टरने काही वर्षांपूर्वी काढले होते तरी देखील पालकांची इच्छा होती. त्यामुळे त्याला इस्पितळात ठेवण्यात आले होते. सदर ऊग्णावर एवढा प्रचंड खर्च येत होता की पालकांना त्यासाठी आपले घर देखील विकावे लागले. अतिशय वाईट परिस्थिती त्यांच्यावर आली. अखेरीस पालकांनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज केला. त्यावर 11 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन या पीठाने जो निवाडा दिला. तो निवाडा देताना देखील पारडीवालांच्या डोळ्यात अश्रु तरळले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाने 2018 मध्ये निक्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती आणि भारतीय संविधानातील कलम 21 अंतर्गत जीवनाचा तो एक हक्काचाच भाग असल्याचे नमूद केले होते. त्याचा आधार घेत न्यायमूर्तींनी हरीश राणा यांच्या इच्छा मरणाला अखेर मान्यता दिली. मात्र हे करीत असताना मानवी आणि नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया पार पाडावी असेही भावनिक पद्धतीने नमूद केले. अखेरच्या सहा दिवसात हरीश राणा यांना आहार देणे बंद केले आणि अखेरीस मंगळवारी तो मरण पावला. अत्यंत बुद्धिवान असा मुलगा मरण पावला तो देखील कशा पद्धतीने याचा पालकांना देखील फार मोठा मनस्ताप झाला. 2018 मध्ये दिलेल्या निवाड्यानंतर बहुदा ही अशी पहिलीच वेळ असावी. तथापि ‘मरावे परी देहऊपी उरावे’ या उक्तीनुसार आपला मुलगा गेला त्याचे दु:ख त्याचे पालक पचवीत होते, परंतु इतर कोणाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याचे डोळे एका अंध व्यक्तीसाठी दान करण्यात आले आणि त्याचे हृदय अन्य एका ऊग्णाला देऊन त्याचे प्राण वाचवले. राणा याच्या देहावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पालकांचा विचार करता त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. हरीश राणा याची एकंदरीत ही हृदयद्रावक कथा पाहिली तर कोणाच्याही डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. दु:खातही थोडेसे सुख असते ते असे, एका बाजूने पालक दु:खात आहेत आणि त्यांना एका गोष्टीचा पश्चाताप होतोय की हे इच्छा मरण हरीश राणाच्या वतीने आपण स्वत: ओढवून घेतलेले आहे. कारण हरीशची परिस्थिती त्यांना पहावत नव्हती. त्याला काही समजतही नव्हते, कारण तो ‘कोमा’मध्ये होता. दुसऱ्या बाजूला थोडा तरी तो देहऊपी कुठेतरी असावा, इतर कोणालाही त्याचा उपयोग व्हावा ह्या उदात्त हेतूने पालकांनी आपल्या मुलाचे नेत्र दान केले आणि त्यातून एका व्यक्तीला जग कसे असते हे दाखविले. दुसऱ्या व्यक्तीला या पालकांनी हृदय दान देऊन त्याला जगविले. या दोन्ही गोष्टींकडे पाहता या देशामध्ये या राणा पालकांनी अनेकांना दूरदृष्टी दिली. अनेकांच्या मनात सहृदय निर्माण केले. आजच्या जगामध्ये आपल्याला सर्वत्र केवळ व्यवहारच दिसतात, परंतु जग नेमके काय आहे, जगणे कसे असते, दुसऱ्यांसाठी कसा त्याग केला पाहिजे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण. म्हणूनच या पालकांनी एका व्यक्तीला नेत्र देऊन त्याला जग दाखविले आणि इतरांनादेखील त्यांनी डोळे असून आंधळे बनू नका तर दूरदृष्टीकोन ठेवा हा संदेश दिलेला आहे. दुसऱ्या बाबतीत तुम्ही विशाल हृदयाचे व्हा व आपले हृदयदेखील इतरांसाठी द्या, असा संदेश दिलेला आहे. संपूर्ण देशभरात राणा परिवार हा एक आदर्श परिवार बनला आहे. आज त्या परिवाराची आर्थिक स्थिती फार नाजूक बनलेली असणार कारण गेली 13 वर्षे त्यांनी आपला मुलगा जगणार, या एकमेव उद्देशाने होईल तेवढा खर्च केला. ते एक जरी कर्तव्य असले तरीदेखील तो एक फार मोठा त्याग त्यांनी आपल्या मुलासाठी केलेला आहे. एका व्यक्तीच्या जाण्यानंतर देखील काही जणांच्या जगण्यात एक नवी आशा निर्माण होऊ शकते. त्यामुळेच माणसाचे जगणे हे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच माणसाच्या मरणानंतरदेखील तो इतरांच्या हृदयात, इतरांच्या डोळ्यात विसावू शकतो. आपल्या अत्याधुनिक विज्ञानाने हे सिद्ध करून दाखविले आहे. हे विज्ञान आपल्यासाठी फार मोठे योगदान आणि वरदान देखील ठरलेले आहे. विज्ञानाने फार मोठी प्रगती केली, हे मान्य असले तरी माणसाचे मन आणि त्याचे हृदय तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच हरीश राणा याच्या निधनानंतर तो पुन्हा एकदा दोन व्यक्तींच्या शरीरामध्ये वास्तव्य करून राहिला. सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाचा जेव्हा निवाडा दिला तो निवाडा देताना देखील सर्वोच्चपदी बसलेल्या न्यायाधीशांच्या डोळ्यांमध्ये अश्रू यावेत, ते भावनिक व्हावेत, या पाठीमागे निवाडा देताना देखील त्याचे संभाव्य परिणाम काय होतील याचा त्यांनी जरूर विचार केलेला होता. हरीश राणा हा युवक आज हयात नाही परंतु देहऊपी तो आजही आहे. त्यामुळेच तो अनेकांच्या हृदयातही विसावलेला निश्चितच आहे.