एक लाख ठेव, माल खरेदीची अट रद्द
कोल्हापूर :
शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाने पोटनियम दूरुस्त करत संघाची निवडणुक लढण्यासाठी किमान तीन वर्ष एक लाखांची ठेव आणि माल खरेदीची घातलेली अट रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी घेतला. तर वाढीव शेअर्स रक्कमेचा निर्णय त्यांनी कायम ठेवला आहे.
शेतकरी संघाच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने काही पोटनियम दुरुस्ती मंजूर केल्या होत्या. यामध्ये संघाची निवडणुक लढण्यासाठी किमान तीन वर्ष एक लाख रुपयांची ठेव ठेवणे, माल खरेदी करणे आणि शेअर्सच्या रक्कमेत वाढ करत व्यक्ती सभासदांची शेअर्स रक्कम 500 वरुन 1000 तर संस्था सभासदांची रक्कम एक हजार वरुन तीन हजार रुपये करणे या पोटनियम दुरुस्तीचा समावेश होता. संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांच्यासह काही सभासदांनी या पोटनियम दूरुस्तीला विरोध केला होता. पण संचालक मंडळाने बहुमताने हे ठराव मंजूर केले. त्याप्रमाणे पोटनियम दुरुस्त करत मंजूरीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवला होता. मात्र येथे सुरेश देसाई आणि काही सभासदांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एक लाख ठेव आणि माल खरेदीची वाढवलेली मर्यादा जिल्हा उपनिबंधक करे यांनी रद्द केली.
सर्वसामान्य सभासदांना संघाच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळींचा आहे. ही बाब सहकार विभागाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर त्यांनी ठेव आणि माल खरेदीची वाढवलेली मर्यादा रद्द करत सर्वसामान्य सभासदांना न्याय दिला आहे.
सुरेश देसाई, माजी संचालक शेतकरी संघ.