माऊलींच्या चरणी एक किलोचा सोन्याचा मुकुट
उद्योजक भारत रामीनवार कुटुंबीयांकडून सुमारे १ कोटी रुपयांचा भक्तिपूर्वक अर्पण
पिंपरी :
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी निस्सीम भक्ती भावनेतून नांदेड येथील उद्योजक भारत विश्वनाथ रामीनवार व त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा आणि एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी येथे अर्पण केला.
या मुकुटाचे मंगळवारी मंदिर समितीकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. हा अलंकार भक्ती, कला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम असलेला असून, त्यावर कमळ, चक्र, सूर्यकिरण यांसारख्या विविध धार्मिक प्रतीकांची कलात्मक नक्षी करण्यात आली आहे.
रामीनवार कुटुंबीयांतील भारत आणि मिरा रामीनवार या भक्त दांपत्यानं हा अलंकार भक्तिभावाने अर्पण केला. विशेष म्हणजे, वारकरी परंपरेशी जोडलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तीभावाने तयार केला असून त्यामुळे त्याला अधिक आध्यात्मिक पावित्र्य लाभले आहे, असे कुटुंबियांनी सांगितले.
या विशेष प्रसंगी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आणि विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांची उपस्थिती होती. त्यांच्या साक्षीने हा अलंकार माऊलींच्या चरणी भक्तिपूर्वक अर्पण करण्यात आला.
हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी माऊलींना परिधान करण्यात येणार असून, तो भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे.
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारंपरिक श्रद्धेची साजेशी मांडणी ही काळाशी सुसंगत भक्तीची अभिव्यक्ती आहे,” अशी भावना रामीनवार कुटुंबीयांच्यावतीने व्यक्त करण्यात आली.