दुचाकी अपघातात एकजण ठार; एक गंभीर
खानापूर : खानापूर-लोंढा महामार्गावर वाटरेनजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याने आकाश अरुण गवाळकर (वय 22) राहणार मुंडवाड या युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र शिवराम विनोद जाधव ( वय 22) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे. खानापूर तालुक्यातील मुंडवाड येथील रहिवासी असलेले आकाश गवाळकर आणि शिवराज जाधव हे दोघे नंदिहळळी येथील मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण घेत होते. शनिवारी, रविवारी दोन दिवस अकॅडमीला सुटी असल्याने ते दोघेजण बजाज पल्सर क्रमांक केए 22 एचआर 4946 या दुचाकीवरून आपल्या मुंडवाड या गावी चालले होते. खानापूर-लोंढा मार्गावर वाटरेनजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात पडली. दोघेही खड्ड्यात पडल्याने आकाश अरुण गवाळकर याच्या तोंडाला, डोकीला आणि छातीला जबर मार बसला होता. 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून त्यांना खानापूर सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी आकाश गवाळकर याला मृत घोषित केले. शिवराज जाधव हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी बिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.