ट्रॅक्टरच्या धडकेत बेडग येथे एक ठार
एकाच वर्षात बाप-लेकाचा अपघाती मृत्यू
सांगली
बेडग (ता. मिरज) येथे ट्रॅक्टर व दुचाकीची धडक होऊन शरद राजाराम केंगार (वय 40, रा. बेडग) हे ठार झाले. बेडगपासून काही अंतरावर हा अपघात झाला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे. दरम्यान, केंगार यांच्या मुलाचाही नऊ महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर पेंगार यांचाही अपघातात मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शरद पेंगार हे मोटारसायकल (एमएच-10-डीबी-2496) वरून मिरज कडून बेडगकडे जात होते. ते गावापासून काही अंतरावर असताना ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच-10-डीव्ही-1144) मिरजेच्या दिशेने जात असताना केंगार यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडकली. यात शरद केंगार हे गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. घटनास्थळावर असलेल्या ग्रामस्थांनी केंगार यांना तातडीने शासकीय ऊग्णालयात दाखल केले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
दरम्यान, शरद केंगार हे मुकबधिर होते. ते मिरज एमआयडीसीत एका कंपनीत काम करत असत. नऊ महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर केंगार यांचाही अपघाती मृत्यू झाला. बाप-लेकावर वर्षभरात अपघाती मृत्यू ओढवल्याच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. केंगार यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.