For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायनाड येथे दरड कोसळून एक ठार

01:03 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
वायनाड येथे दरड कोसळून एक ठार
Advertisement

महाराष्ट्रातील ‘मिसिंग लिंक’ प्रमाणे घडली दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था / वायनाड (केरळ)

केरळ राज्यातील वायनाड येथे एका निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना साधारणत: महाराष्ट्रातील ‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेप्रमाणेच अतिपावसामुळे घडली असल्याचे दिसून येत आहे. अनाकोमपोलिल ते मेपाडी या बोगदा प्रकल्पावर दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती केरळच्या राज्य सरकारने दिली.

Advertisement

दरड कोसळल्याने या बोगद्यात माती आणि दगडांचा प्रचंड ढिगारा झाला असून त्याखाली किमान 7 कामगार दबले गेले असावेत, अशी शक्यता आहे. या कामकारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कल्लाडी गावाजवळच्या मीनाक्षी सेतूनजीक ही दुर्घटना मंगळवारी सकाळी घडली. हा बोगदा मल्लापुरम आणि वायनाड या जिल्ह्यांना जोडण्यासाठी बांधण्यात येत आहे. गेले एक वर्षभर या प्रकल्पावर काम होत असून पावसामुळे कामात व्यत्यय येत आहे.

राष्ट्रीय आपदा निवारण पथकाचे कार्य

ही दुर्घटना घडल्यानंतर त्वरित राष्ट्रीय आयदा निवारण पथकाने घटनास्थळी जाऊन आपदा निवारणाच्या कार्याला प्रारंभ केला आहे. स्थानिक नागरीकही मोठ्या प्रमाणात साहाय्य करीत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे तीन जणांचे जीव वाचले आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे. ज्या स्थानी बांधकाम केले जात होते, त्याच्या जवळच कामगार वस्ती करुन रहात आहेत. या वस्तीवरही ही दरड कोसळल्याने कामगारांची अनेक तंबू घरे दबली गेली आहेत. त्यामुळे जीवीत हानी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जखमींवर उपचार

या दुर्घटनेत आतापर्यंत सात जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. बोगद्याचे निर्माण कार्य आता थांबविण्यात आले असून कामगारांना तेथून अन्य कामगारांना तेथून हटविण्यात आल्याचे वृत्त आहे. केरळ सरकारच्या दोन मंत्र्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून काढण्यात आले आहेत, असे समजते.

मानवनिर्मित अपघात

ही दुर्घटना मानवनिर्मित आहे, असा आरोप केरळचे मंत्री टी. सिद्दिक यांनी केला आहे. दरड कोसळण्याची घटना नैसर्गिक नाही. बोगद्याच्या बांधकामात नियमांचे पालन न केल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. लवकरच चौकशीचा आदेश देण्यात येईल. राज्य सरकार माहिती घेत आहे, अशीही माहिती केरळच्या या मंत्र्यांनी दुर्घटनेसंदर्भात दिली.

2024 च्या घटनेची आठवण

2024 मध्ये याच भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पर्यावरण तज्ञांनी प्रशासनाला भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली होती. तथापि, या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले, असा आरोप केला जात आहे. बोगदे खणताना खडक फोडण्यासाठी स्फोट केले जातात. त्यामुळे खडकांना भेगा पडतात आणि अतिवृष्टीमुळे या भेगांमध्ये पाणी जाऊन दरडी कोसळतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. या नव्या दुर्घटनेच्या चौकशीतून या बाबींवर प्रकाश पडणे शक्य आहे.

दुर्घटना मानवनिर्मित

ड केरळमधील दरड कोसळण्याची दुर्घटना मानवनिर्मित असल्याचा आरोप

ड सहा जखमींची प्रकृती गंभीर, घरांवरही दरड कोसळल्याने गंभीर स्थिती

ड राष्ट्रीय आपदा निवारण संस्थेकडून त्वरित घटनास्थळी बचाव कार्य सुरु

ड ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या कामगारांची संख्या अधिक असणे शक्य

Advertisement
Tags :

.