बोलेरो पिकअप व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
कुडाळ येथील घटना ;अचानक पिकअप थांबविल्याने दुचाकीची धडक
कुडाळ -
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते काळपनाका रस्त्यावर कृष्णाई सुपर मार्केट समोर भरधाव वेगातील बोलेरो पिकअप अचानक मधोमध थांबविल्याने मागून जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलची बोलेरो पिकअपला जोराची धडक बसली.यात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार पुंडलिक नारायण नाईक ( 68, रा.आंबलपाड- नाईकवाडी ) यांचे कुडाळ ग्रामीण रुग्णालयात काही वेळातच त्यांचे निधन झाले. ही घटना मंगळवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. बोलेरो पिकअप चालक भगवान नामदेव गवंडे (47,रा. ता.भोकरदन ,जि. जालना ) हा दारूच्या नशेत बोलेरो चालवित होता. त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुंडलिक यांच्या अकाली निधनाने आंबलपाड दशक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुंडलिक नाईक आंबलपाड टाळंबा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होत.ते काल आपल्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन कुडाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ते काळपनाका रस्त्याने आपल्या घरी जात होते. या रस्त्यावर त्यांच्या समोरून काळपनाका ( मुबई गोवा महामार्ग ) दिशेने भगवान गवंडे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप भरधाव वेगात जात होता.त्याने सदर पिकअप येथील कृष्णाई सुपर मार्केट समोर कोणताही अडथळा नसताना दारूच्या नशेत अचानक ब्रेक लावून रस्त्याचे मधोमध थांबविली. त्यामुळे पुंडलिक नाईक यांच्या ताब्यातील मोटारसायकलची बोलेरो पिकअपच्या मागील बाजूला जोराची धडक बसली. यात पुंडलिक नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी रोहित भोगटे व तेथील नागरिकांनी धाव घेत पुंडलिक यांना 108 रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. मात्र,उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचे निधन झाले.पिकअप चालक भगवान गवंडे हा दारूच्या नशेत होता.कुडाळ पोलिस ठाण्याचे हवालदार आनंद पालव , श्री चिंदरकर यांनी घटनास्थळी दाखल होत त्याला ताब्यात घेतले तसेच पंचनामा केला. कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटना समजतात आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, उपसरपंच गोट्या चव्हाण , माजी सरपंच प्रवीण सावंत ,स्थानिक लोकप्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. विच्छेदनानंतर पुंडलिक यांचा. मृतदेह बुधवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची खबर प्रथमेश पंढरीनाथ लाकम ( 34, रा.कुडाळ -भैरववाडी ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.भारतीय न्याय संहिता 105, 281, मोटार वाहन अधिनियम कलम 184,185 प्रमाणे पिकअप चालक भगवान गवंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.