शिराळा बाह्यवळण रस्त्यावर अपघातात एक ठार
चार चाकी गाडीच्या एअर बॅग ओपन होऊनही दुर्दैवी मृत्यू
सांंगली
शिराळा येथील बाह्यवळण रस्त्यावर श्री गुरू गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दूध वाहतूक गाडी व चारचाकी गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर चार गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, यामधील चारचाकी गाडीच्या पुढील शेवटच्या दोन्ही एअर बॅग ओपन झाल्या होत्या. तरीही यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाला. या अपघातात कैलास ताराचंद चव्हाण (३०, रा.पुणे आळंदी, मूळ गाव वरदडी बुद्रुक, ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा) असे मयत व्यतीचे नाव आहे. सदर घटना सोमवारी पहाटे घडली. जखमींना कराड येथील ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथून मयत कैलास चव्हाण हे आपली पत्नी कांचन चव्हाण (२३), सासरे भीमराव दलपत पवार (५०) ,सासू वर्षा भीमराव पवार (४५ दोघे रा. गारटेकी ता. मंठा जि. जालना) हे चारचाकी (एम एच १४ के क्यू 9978) ने ननिजला देवदर्शनासाठी निघाले होते. या गाडीचे चालक पवन संतोष राठोड (२४, रा. आळंदी, मूळगाव पिंपरखेड बुद्रुक ता. सिंदखेडाराजा जि. बुलढाणा) हे होते. यावेळी बिऊरकडून शिराळाकडे येणारी दूध वाहतूक गाडी (एम एच १० बी आर ४९५२) याची धडक झाली. यावेळी कैलास चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. भिमराव पवार, वर्षा पवार, कांचन चव्हाण, चालक पवन राठोड हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत दूध वाहतूक गाडीचे चालक अमोल जोतीराम शेटके (४०) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय पाटील हे करीत आहेत.