बाणावलीत धिरयोच्यावेळी शिंग खुपसल्याने एक ठार
मात्र उशिरापर्यंत पोलीस तक्रार नव्हती : मयताला नेले खासगी हॉस्पिटलात
मडगाव : बाणावली येथे धिरयोच्या वेळी शिंग खुपसल्याने काल सोमवारी संध्याकाळी वार्का-फात्राडे परिसरातील एका व्यक्तीचा बळी गेला. मात्र, या प्रकरणाची सोमवारी रात्री उशिरापर्यंत कोलवा पोलिसस्थानकात तक्रार नोंद झाली नव्हती. मयत व्यक्तीला सरकारी इस्पितळात न नेता मडगावातील खासगी हॉस्पिटलात नेण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमागे बाणावली समुद्रकिनाऱ्यावर बैलाने शिंग खुपसल्याने एक विदेशी पर्यटक जखमी होण्याची घटना ताजी असतानाच काल सोमवारी धिरयोच्यावेळी शिंग खुपसल्याने एका व्यक्तीचा बळी गेला. मात्र, या प्रकरणाची गुप्तता ठेवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जोरदार प्रयत्न सुरू होते.
मयताला नेले खासगी हॉस्पिटलात
शिंग खुपसल्याने बळी गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सरकारी इस्पितळात न नेता, मडगावातील खासगी इस्पितळात नेण्यात आला. मात्र, या इस्पितळाच्या व्यवस्थापनाने हा मृतदेह इस्पितळात येताच कोलवा पोलिसांना कल्पना दिली व कोलवा पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक सुभाष गांवकर हे खासगी इस्पितळात या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी दाखल झाले. सरकारी इस्पितळ सोडून खासगी इस्पितळात नेण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलिसांपासून हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी खासगी इस्पितळात धाव घेतल्याची चर्चा बाणावली परिसरात होती. उपलब्ध माहितीनुसार धिरयोच्या वेळी बैलाच्या मागच्या बाजूला थांबून बैलाचे शेपूट हातात धरून बैलाला धिरयोसाठी प्रोत्साहीत करीत असताना त्याला शिंग खुपसले. त्यात ही व्यक्ती जबर जखमी झाली. वैद्यकीय उपचारापूर्वीच मृत्यू आला. या धिरयोचे आयोजन कालवाडो-बाणावली येथे करण्यात आले होते.
धिरयो प्रकरणी सखोल चौकशी करा : गोवंश संरक्षण अभियानची मागणी
बाणावली येथे धिरयोच्या वेळी शिंग खुपसल्याने एकाचा बळी गेला. या प्रकरणाची कोलवा पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोवंश संरक्षण अभियानचे हनुमंत परब यांनी केली आहे. धिरयोत एकाचा बळी गेल्याने कोलवा पोलिसस्थानकाच्या हद्दीत धिरयो सुरू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. धिरयो आयोजनावर न्यायालयाने बंदी घातली असताना देखील धिरयो आयोजित केल्या जात असल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा हनुमंत परब यांनी केला. नॉर्मा आल्वारीस यांनी धिरयो आयोजनावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी होताना न्यायालयाने दक्षिण व उत्तर गोव्यात धिरयो बंदी घालावी, यासाठी पोलिसांना अधिकार दिलेले आहेत. पण, पोलिस धिरयो रोखू शकलेले नाहीत हे या घटनेतून स्पष्ट झाल्याचे मत त्यांनी मांडले. मयत व्यक्ती धिरयोत नव्हे तर गोठ्यात रेड्याचे शिंग लागून जखमी झाल्याची माहिती कोलवा पोलिसस्थानकाच्या निरीक्षकांनी आपल्याला दिल्याचे हनुमंत परब यांनी सांगितले. जर गोठ्यात शिंग लागले असते तर त्याला सरकारी इस्पितळात का नेले नाही, असा सवालही उपस्थित होत असल्याचे परब म्हणाले.