न्यूयॉर्कमधील स्फोटात एक ठार, 36 जखमी
ड्राय डॉकमधील स्फोटाने खळबळ : अग्निशमन दलाकडून बचावकार्य
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहरातील स्टेटन आयलंड येथील ड्राय डॉकमध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य 36 जण जखमी झाले. घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य राबविले. स्फोटाचे कारण सध्या अज्ञात आहे. जवान आत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा स्फोट झाला. या घटनेत दोन अग्निशमन कर्मचारीही गंभीर जखमी झाले. एका फायर मार्शलच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले असून मेंदूत रक्तस्राव होत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृताविषयी अधिक तपशील जाहीर केलेला नाही, परंतु तो एक नागरिक असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आणि मोठ्या संख्येने मदत व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. या घटनेची सखोल चौकशी सुरू केली जाईल, असे महापौर ममदानी यांनी सांगितले
