Kolhapur ZP Madarsangh 2025: आजाऱ्यात एक गट, दोन गण रद्दच, कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
पूर्ववत 3 गट व 6 गण कायम ठेवण्याची मागणी लावून धरण्यात आली होती
आजरा : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले. याची घोषणा सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली असून आजरा तालुकावासीयांनी तालुक्यात पूर्ववत तीन गट व सहा गण कायम ठेवण्याच्या मागणीला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या असून तालुक्यातील एक गट व दोन गण रद्दच करण्यात आले असून सोमवारी उत्तूर, पेरणोली या दोन गटांची व तर उत्तूर, भादवण आणि पेरणोली, वाटंगी या चार गणांची निश्चिती करून तशी रचनाही तयार करण्यात आली आहे.
आजरा नगरपंचायत क्षेत्र वगळूनही तालुक्यातील सरासरी 35 हजार लोकसंख्येचा एक जि. प. गट तयार होतो हे आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय मंडळींनी प्रशासनासमोर मांडले होते. त्यामुळे तालुक्याची भौगोलिक परीस्थिती आणि लोकसंख्या लक्षात घेऊन तालुक्यात पूर्ववत तीन गट व सहा गण कायम ठेवण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले होते. तर ग्रामविकास मंत्र्यांकडेही तशी मागणी करण्यात आली होती. तरीही सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या गण आणि गटांमध्ये तालुक्यात उत्तूर, पेरणोली असे दोन गट तर उत्तूर, भादवण व पेरणोली व वाटंगी असे गण निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिरण्यकेशी नदीचा उजवा व डावा तीर आणि आजरा महागांव रस्याची उजवी व डाव्या बाजूचा आधार घेत दोन गटांमध्ये गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकांची सोय पाहिली गेलेली नाही हे गटांमधील समाविष्ट गावांचा विचार करता स्पष्ट दिसून येत आहे.
उत्तूर जिल्हा परिषद गटामधील उत्तूर पंचायत समिती गणामध्ये उत्तूरसह, पेंढारवाडी, मुमेवाडी, महागोंड, चव्हाणवाडी, धामणे, आरदाळ, वडकशिवाले, बहिरेवाडी, बेलेवाडी हु।।, हालेवाडी, होन्याळी, झुलपेवाडी, कर्पेवाडी दुमाला, चिमणे या गावांचा समावेश आहे.
या गटातील भादवण गणात भादवण, पेद्रेवाडी, मडिलगे, मासेवाडी, चांदेवाडी, जाधेवाडी, वझरे, भादवणवाडी, हाजगोळी बु।।, हाजगोळी खु।।, सरोळी, सुलगांव, सोहाळे, निंगुडगे, खेडे, खोराटवाडी, कानोली, कोवाडे व गजरगांव या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
पेरणोली जिल्हा परिषद गटातील पेरणोली गणात पेरणोलीसह पारपोली, पोळगांव, मसोली, शेळप, देऊळवाडी, देवर्डे, देवकांडगांव, दाभिल, लाटगांव, किटवडे, एरंडोळ, आवंडी, इटे, वेळवट्टी, हरपवडे, हाळोली, सुळेरान, साळगांव, कासार कांडगांव, खानापूर, कोरीवडे, गवसे या गावांचा समावेश आहे.
वाटंगी गणात वाटंगी, मलिग्रे, मेंढोली, चाफवडे, लाकूडवाडी, सिरसंगी, चितळे, किणे, बुरूडे, मुरूडे, हात्तिवडे, होनेवाडी, सरंबळवाडी, सुळे, श्रृंगारवाडी, कोळिंद्रे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
आता लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे
तालुक्यात पूर्ववत तीन जि. प. गट व सहा गण कायम रहावेत अशी याचिका जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याची सुनावणी बुधवार दि. 16 रोजी होणार असून या सुनावणीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.