गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बलवडीतील एकावर तडीपारची कारवाई; सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत 6 महिन्यांसाठी प्रवेशबंदी
विटा : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विटा पोलिसांनी एका समाजकंटकाविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे. विशाल संजय जाधव (वय 32, रा. बलवडी भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली) याला सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या जाधव याच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जाधव याच्याविरुद्ध तडीपारीचा आदेश जारी केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, जाधव याच्यावर विटा पोलिस ठाण्यात शरीराविरुद्धचे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भारतीय न्याय संहिता, 2023 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर विविध गुन्हे नोंद आहेत. त्याच्या कथित गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सवासह आगामी सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच समाजकंटकांवर वचक राहावा, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.