For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक दिवस महानगरपालिकेच्या कार्यालयाचीही होणार विक्री?

10:10 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक दिवस महानगरपालिकेच्या कार्यालयाचीही होणार विक्री
Advertisement

मनपाचा अक्षम्य दुर्लक्षपणा कारणीभूत : नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

Advertisement

बेळगाव : बांधकाम परवानगीसाठी देण्यात आलेल्या फायली गायब होत आहेत. महानगरपालिकेची मालमत्ता कोठे आहे? त्या मालमत्तेमध्ये अतिक्रमण होत आहे का? रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकामे होत आहेत. या सर्व समस्यांकडे महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे एक दिवस महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाचीही विक्री होण्याची शक्यता एका नगरसेवकाने अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केली. अर्थ व कर स्थायी समितीची बैठक गुरुवारी झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थ व कर स्थायी समितीच्या चेअरमन वीणा विजापुरे होत्या. यावेळी महानगरपालिकेच्या जागांबाबत उच्च न्यायालयामध्ये खटले दाखल आहेत. ते खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेकांनी बांधकामे बेकायदेशीर केली असताना आतापर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई केली नाही. गेल्या वर्षभरात एक तरी कारवाई झाली आहे का? झाली असेल तर त्याची माहिती द्या, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. केवळ कायदा सांगत महानगरपालिकेची जागा गायब होत असेल तर आम्ही नगरसेवक म्हणून काय करायचे? महानगरपालिकेची ही इमारतदेखील एखाद्या व्यक्तीच्या नावावर विक्री करण्यास कोणीही मागेपुढे पाहणार नाही, असेदेखील नगरसेवकांनी सांगितले.

‘त्या’ कंत्राटदाराबाबत चर्चा

Advertisement

भूभाडे वसुली कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आले. त्या व्यक्तीने महानगरपालिकेकडे रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याचा ठेका रद्द करण्याचे ठरविताच उच्च न्यायालयात त्या कंत्राटदाराने धाव घेतली. न्यायालयाने 50 टक्के रक्कम 8 मार्चपर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हा वाद असल्यामुळे या विषयावर चर्चा करू नका, तसेच इतिवृत्तातून हा विषय काढून टाका, अशी सूचना कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी केली. त्यामुळे चर्चा करून पुढील ठरावाबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला. या बैठकीला महसूल उपायुक्त गुरुप्रसाद द•s, कौन्सिल सेक्रेटरी महेश जे. यांच्यासह इतर अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

समन्वय कमिटी नेमण्याची मागणी

सार्वजनिक बांधकाम, तसेच इतर विभागांची समन्वय कमिटी नेमून अतिक्रमण विरोधात मोहीम राबवावी, अशी मागणी या बैठकीत नगरसेवकांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनीही एकत्रपणे काम करून शहरातील होणारे अतिक्रमण हटविण्याचे ठरविण्यात आले. मात्र, हा प्रयोग यशस्वी ठरणार का? हे देखील आता पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.