महिला कामगारांना मासिक पाळी काळात एक दिवसाची पगारी रजा
सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आदेश लागू
बेंगळूर : महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, वस्त्राद्योग क्षेत्र, बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी क्षेत्र आणि इतर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या काळात एक दिवसाची पगारी रजा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कामगार कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात एक दिवसाची रजा मिळणार आहे. बुधवारी कामगार खात्याने यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला. राज्य कारखाने कायदा-1948, कर्नाटक दुकाने आणि वाणिज्य संस्था कायदा-1961, बागायत कामगार कायदा-1951, विडी आणि सिगार कामगार कायदा-1966 आणि मोटार वाहतूक कामगार कायदा-1961 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व उद्योग
व संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा देण्याबाबत चर्चा करून अहवाल देण्यासाठी विविध स्तरावरील अधिकारी, तज्ञ डॉक्टर, कामगार वर्गातील प्रतिनिधी, उद्योगांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणारी समिती नेमली होती. या समितीने अनेक टप्प्यात चर्चा करून अहवाल सादर केला होता. समितीने वर्षातून 6 दिवसांची रजा देण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सरकारने काही अटींवर महिलांना दर महिन्याला मासिक पाळीच्या काळात एक दिवसाची म्हणजेच वर्षातून 12 रजा देण्याबाबतचा आदेश जारी केला आहे. संबंधित महिन्यातील ही रजा पुढील महिन्यात ‘कॅरी ओव्हर’ करण्याची मुभा नाही. सदर रजा घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज असणार नाही, असे सरकारने आदेशपत्रकात स्पष्ट केले आहे.