...एक दिवस मीसुद्धा लष्करी सेवेत येणार!
वायनाड मदतकार्यातील जवानांना तिसरीतील विद्यार्थ्याचा ‘सलाम’
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून विविध यंत्रणांचे प्रयत्न सुरू असतानाच चिखल-मातीतून मृतदेह बाहेर काढले जात आहे. मृतदेहांचा शोध घेण्यासोबतच संपर्कव्यवस्था सुधारण्यासाठी आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लष्कराकडून सुरू असलेले कार्य कौतुकास पात्र ठरत आहे. याचदरम्यान वायनाडमधील सैनिकांच्या बचावकार्याने प्रभावित होऊन तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने लष्कराला भावनिक पत्र लिहिले आहे. एक दिवस सैन्यात भरती होणार असल्याचे विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे. रायन असे पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
वायनाडमधील एएमएलपी शाळेचा विद्यार्थी असलेल्या रायनने मल्याळममध्ये लिहिलेल्या पत्रात ‘प्रिय भारतीय लष्कर, माझ्या वायनाडला मोठ्या प्रमाणात भूस्खलनाचा फटका बसला आहे. त्यामुळे मोठा विध्वंस झाला आहे. तुम्हाला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवताना मला अभिमान आणि आनंद वाटतो.’ असे लिहिले आहे. मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये पूल बांधत असताना तुम्ही भूक भागवण्यासाठी बिस्किटे खाताना दिसत आहात. या दृश्याने मी खूप प्रभावित झालो असून मी सुद्धा एक दिवस भारतीय सैन्यात सामील होऊन माझ्या देशाचे रक्षण करू इच्छितो’, असे त्याने पुढे म्हटले आहे.
वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शेकडो कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. यामध्ये लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचा समावेश आहे. बचाव पथकात 500 हून अधिक लष्करी जवानांचा समावेश आहे. घटनास्थळी अवजड यंत्रे आणि आधुनिक उपकरणेही तैनात करण्यात आली आहेत. रस्त्यांची डागडुजी, पूल उभारणी, मृतदेह शोधणे, माती-गाळ काढणे या सर्वच कामांमध्ये लष्कराने आघाडी घेतली आहे. वायनाडमध्ये भूस्खलन दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये 350 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो बेपत्ता आहेत. साहजिकच मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे.
भारतीय लष्कराकडून आभार
पत्रामध्ये रायनने भारतीय लष्कराला उल्लेख ‘युवा योद्धे’ असा केला आहे. या पत्राची माहिती लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर अधिकारी-जवानांनी रायनचे आभार मानले. “तुझ्या हृदयस्पर्शी शब्दांनी आम्हाला भारावून टाकले आहे. कठीण काळात आशेचा किरण बनणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तुझे पत्र या मिशनला प्रोत्साहन देते. तुझ्यासारखे वीर आम्हाला आमचे सर्वोत्तम कौशल्य दाखविण्यासाठी प्रेरणा देतात”, असा अभिप्राय लष्करी अधिकाऱ्यांनी रायनला कळवला आहे. लष्करी गणवेश परिधान करण्यासाठी आपण आतुर असल्याचे रायनने आपल्या पत्रात नमूद केले होते. त्याला अनुषंगून ‘आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत’ असेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.