लॉडविक पॉईंटवरुन उडी मारुन एकाची आत्महत्या
महाबळेश्वर :
महाबळेश्वर शहरापासून अंदाजे पाच किमी अंतरावर लॉडविक पॉईंट परिसरातील एलिफंट हेड पॉईंट येथून उडी मारून बुकिंग एजंट म्हणून व्यवसाय करणाऱ्या संजय वेलजी रुघानी (वय 52 सध्या रा. पांचगणी, मूळ शांतीनगर मिरा रोड, मुंबई) यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अंदाजे चारशे फूट खोलदरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. तब्बल सहा तासांच्या ट्रेकर्सच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
शहरापासून अंदाजे पाच किमी अंतरावर प्रसिद्ध लॉडविक, हत्तीचा माथा हे पॉईंट असून गुरुवारी सायंकाळी लॉडविक पॉईंट येथे पर्यटकांची रेलचेल होती. दोन नवदांपत्य व एक परदेशी पर्यटक या पॉइंटवर पर्यटनाचा आनंद घेत होते. पर्यटक दांपत्य या पॉईंटवर बसून व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्याच वेळी संजय रुघानी यांनी आपल्या जवळपास कुणीही नसल्याचा अंदाज घेत त्यांनी थेट स्वत:ला दरीमध्ये झोकून दिले.
या घडलेल्या प्रकारची माहिती लॉडविक पॉईंट येथे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांना दिली. स्टॉलधारकांना या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांसह वन विभाग व महाबळेश्वर व सह्याद्री या दोन्ही ट्रेकर्स टीमला दिली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर व सह्याद्री या दोन्ही ट्रेकर्सच्या जवानांनी उडी मारलेल्या ठिकाणाहून रोपाच्या साहाय्याने खाली उतरण्यास सुरुवात केली.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे ट्रेकर अमित कोळी व त्यांचे सहकारी प्रथम चारशे फूट खोल दरीमध्ये रोपाच्या मदतीने उतरले. सहा तासांच्या अथक प्रयत्नाने या खोल दरीमधून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
महाबळेश्वर व पांचगणी परिसरात संजय रुघानी हे बुकिंग एजंट म्हणून व्यवसाय करत होते. दोन्ही पर्यटनस्थळावरील विविध हॉटेल्सवर त्यांचे नेहमीच येणे जाणे होते अशी माहिती मिळत असून त्यांचे दोन्ही मोबाईल घटनांसाठी सापडले आहेत.
मृतदेह दरीबाहेर काढण्याच्या मोहिमेत ट्रेकर्सचे जवान अमित कोळी, सोमनाथ वागदरे, संजय पार्टे, सौरभ गोळे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरव साळेकर, सुजित कोळी, आतेश धनावडे, अनिल लांगी, सूर्यकांत शिंदे, सुजित कोळी, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, अक्षय नाविलकर, सचिन डोईफोडे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, मिथुन चव्हाण, किरण चव्हाण, विक्रम शेलार यांच्यासह महाबळेश्वर वन विभागचे वनरक्षक- लहू राऊत, वन कर्मचारी गणेश वागदरे, संतोष बावळेकर, निलेश सपकाळ आदी उपस्थित होते. या घटनेचा अधिक तपास पो. नि. बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रौफ इनामदार करत आहेत.