एक कॉल...प्रॉब्लेम सॉल्व्ह...! पी.एन. साहेबांची खासियत; कार्यकर्तेही कार्यपध्दतीवर बेहद खुश
कोल्हापूर : संतोष पाटील
करवीरचे लोकप्रिय आमदार पी.एन. पाटील यांच्या एक्सिटमुळे कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणारी नाही. पी.एन. साहेबांचा कनेक्ट नाही,असा नाहक आरोप त्यांना कधीही न भेटलेल्या लोकांकडून व्हायचा. मात्र, पी.एन. यांच्या संपर्कात जे-जे आलेत त्या सर्वांना त्यांच्या माणसं जोडण्याच्या स्वभावाचा परिस स्पर्श झालेला आहे. कार्यकर्ता ओळखीचा असो वा नसो, मतदार संघातीलच पाहिजे असे नाही, अडचणीच्या काळात रात्री अपरात्री कधीही कॉल करु दे...! पी.एन. साहेब कॉल घेतातच, व्यस्त असले तरी पुन्हा अनोळखी नंबरवरुन आलेला कॉल असला तर कॉलबॅक करणार म्हणजे करणार, समोरच्या व्यक्तीने सांगितलेलं काम होणार की नाही, हे तोंडावरच सांगण्याची त्यांची पध्दत. साहेबांनी संबंधित कामासाठी कॉल केला म्हणजे ते शंभर टक्के झालेच ही त्यांची खासियत होती. म्हणूनच पी.एन. साहेबांचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह...! या साहेबांच्या कार्यपध्दतीवर त्यांचे लाखो कार्यकर्ते अन् फॉलोअर्स फिदा होते. आता एका कॉलवर सांगितलेलं काम आपलं समजून करणारे साहेब या जगात नाहीत, ही कल्पनाच या कार्यकर्त्यांना पचनी पडणारी नाही.
साहेब....सीपीआरमध्ये जवळच्या नातेवाईकाला ॲडमिट केले आहे. तुम्ही डॉक्टरला कॉल करुन उद्याच ऑपरेशन करण्याबाबत सांगायला पाहिजे... भावकीत भांडणे झाली, पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत आहेत. तुमची मदत पाहिजे...बदलीसाठी प्रयत्न करुन दमलो, तुम्ही काहीतरी करा...गावातील रस्ता खराब झाला आहे, पावसाळ्यापूर्वी करावाच पाहिजे...पाणंद रस्ता कधी होणार..अशी वैयक्तिक आणि सामाजिक कामांसाठी रोज कितीतरी फोन साहेबांना येत असत. पी.एन. साहेब आलेला प्रत्येक फोन घेतातच. कामात व्यस्त असले तरी पुन्हा परत कॉल करुन का कॉल केला होता, हे आवर्जून विचारणा करत असत. समोरचा जे काम सांगेल ते संयुक्तिक असेल तर काही काळजी करु नका होवून जाईल, असे स्पष्ट सांगत. जे होणार नाही, ते काम होवू शकत नाही, असे बजावत. बघतो करतो असे झुलवत ठेवण्याची राजकीय भाषा पी.एन. साहेबांना कधी जमलीच नाही.
पी.एन. साहेबांचा लोकांशी संपर्क नाही, असा एक भ्रम त्यांना आयुष्यात कधीही न भेटणाऱ्यांकडून पसरवला जातो. मात्र, पी.एन साहेब यांना जो-जो कामानिमित्ताने भेटला आहे, त्याला मात्र याच्या विरुध्द अनुभव आला आहे. अडल नडलेला आपल्याकडे आला आहे ना... आपल्या हातून काम जे होतयं ते करायचं. मग मागील आडी ठेवायची नाही. किंवा समोरचा माणूस आपल्या राजकारणासाठी भविष्यात उपयोगाला पडेल काय ? याचा कधीही विचार पी.एन. साहेबांनी केला नाही. आपल्याकडे आलेल्या माणसाच योग्य ते काम माणूसधर्मातून करायचं. हाच त्यांच्या राजकारणाचा पाया होता. त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच पी.एन. साहेब म्हणजे किमान दीड लाख कार्यकर्त्यांपासून पुढे मोजायचं ही पध्दत रुढ झाली. एरवी एखाद्या नेत्यानं राजकीय कार्यक्रम घ्यायचं म्हटले की त्यासाठी घोडा-गाडी अन् जेवणावळीच्या जोडण्या अगोदर घालाव्या लागतात. मात्र, एक सार्वत्रिक निरोप गेला की साहेबांसाठी यायला लागतय असे म्हणत हजारो कार्यकर्त्यांचे पाय त्या कार्यक्रमस्थळी वळायचे. पी.एन. साहेबांनी आपल्या प्रामाणिक आणि पारदर्शी कामाच्या पध्दतीतून जोडलेल्या माणासांचा गोतावळा हीच त्यांची ताकद होती. ही ताकद पी.एन साहेबाच्या मागे आयुष्यभर राहिली. आता आपले साहेब नाहीत हे पचवणं त्यांच्यावर जीवापार प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र अवघड आहे.