एकाने सिग्नल तोडला अन् पाच वाहनांचा अपघात! कराडात उपजिल्हा रूग्णालयासमोरील घटना
चारजण जखमी
कराड प्रतिनिधी
ग्रीन सिग्नल संपल्यानंतर ऑरेंज सिग्नल लागला असतानाही सुसाट चार चाकी पळवण्याच्या प्रयत्नात एक पिकअप रिक्षासह दोन दुचाकींना भर चौकात धडकली. कराडच्या उपजिल्हा रूग्णालयासमोर चार वाहनांच्या विचित्र अपघातात अपघातात दुचाकीसह रिक्षाचा चक्काचूर झाला तर पिकअप व अन्य एक दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांना वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा नाका रस्त्यावर वेणुताई उपजिल्हा रूग्णालयासमोरील चौकात सिग्नल यंत्रणा आहे. या चौकात चार बाजूने चार रस्ते असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कराड बाजूकडे जाणाऱ्या रोडच्या खांबावरील ग्रीन सिग्नल लागला. सिग्नलचे टायमिंग संपल्यानंतरही एक पिकअप वेगाने सुसाट कराड बसस्थानकाच्या दिशेने निघाली होती. तोपर्यंत दुसऱ्या खांबावरील ग्रीन सिग्नल लागल्याने एक रिक्षा चालक वळण घेत असताना पिकअपने त्याला जोरदार धडक दिली. शिवाय दोन दुचाकींनाही धडक दिली. पिकअपने रिक्षाला दुभाजकासह सिग्नलच्या खांबावर रेटल्याने रिक्षातील एका महिलेसह दोन प्रवासी जखमी झाले. तर पिकअपची धडक अन्य एका दुचाकीला बसल्याने त्या दुचाकीस्वारही जखमी झाला.
अपघातामुळे सिग्नलच्या चौकात प्रचंड खळबळ उडाली. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस आर. डी. देशमुख, एस. एस. नाफड, सुनील पाटील, महिला वाहतूक पोलीस यादव आळंदे यांनी अपघात होताच तातडीने चारही बाजुची वाहने थांबवली. नागरिकांच्या मदतीने त्यांनी पिकअप मागे घेऊन त्याच्यापुढे दबलेल्या रिक्षातील प्रवाशांना बाजूला केले. दोन पेलिसांनी दुचाकीवरील जखमीला तात्काळ रूग्णालयात पाठवले तर इतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ढकलत चौकातून बाजूला केली. या अपघाताने काही काळ वाहतूक कोंडी झाली. अपघात विभागाचे धीरज चतुर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमींवर कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.
दक्ष नागरिकाचा वाद अन् अपघात
उपजिल्हा रूग्णालयासमोरील चौकात पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला नियमांचे उल्लंघन केल्याने अडवले. त्या नागरिकाने पोलिसांशी वाद घालत मी कराडचा एक दक्ष नागरिक आहे. मला नियम माहिती आहेत. यावरून पोलिसांशी दुचाकीस्वार नागरिकाचे बोलणे सुरू असतानाच समोर अपघात झाला. हा अपघात झाल्यावर वाहतूक पोलीस आर. डी. देशमुख, सुनील पाटील यांनी त्या दुचाकीस्वार नागरिकांना बघा नियम तोडला की काय होते? हे सांगत अपघाताच्या घटनेकडे धाव घेतली.