देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक अटकेत
सांगली :
येथील वानलेसवाडीत मैत्रेय बिल्डींगमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन थांबलेल्या अरबाज ऊर्फ इब्राहिम अल्लाउद्दीन रेठरेकर (वय २१, रा. दत्त कॉलनी, सुभाषनगर रस्ता, मिरज) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. दि. १९ रोजी रात्री आठ वाजता ही कारवाई केली. त्याच्याकडून पिस्तुल व जीवंत काडतूस असा ५० हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. दि. १९ रोजी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तेव्हा रात्रीच्या सुमारास पोलिस कर्मचारी आर्यन देशिंगकर यांना वानलेसवाडी येथे बंद अवस्थेत असलेल्या मैत्रेय बिल्डींगमध्ये एक तरूण पिस्तुल घेऊन बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री आठच्या सुमारास तेथे सापळा रचून तरूणाला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तुल व जीवंत काडतूस आढळले. त्याला विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी देशिंगकर यांनी फिर्याद दिली आहे. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, सहायक निरीक्षक चेतन माने, कर्मचारी संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, प्रशांत माळी, योगेश पाटील, मुलाणी, देशिंगकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सहायक निरीक्षक माने तपास करत आहेत. रेठरेकर यांने हे पिस्तुल कोठुन आणले, कशासाठी आणले, यापुर्वीही त्यांने अशी काही पिस्तुले आणली होती का याबाबतचा पोलीसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.