महिला खूनप्रकरणी एकास अटक
इस्लामपूर :
येथील साईनगरमधील हानीफाबी मदनसाब मुल्ला (६५) या शेतमजूर महिलेच्या खून केल्याप्रकरणी मुवाज इलाही मुलाणी (२१ रा. ईदगाह मैदानाजवळ, इस्लामपूर) याला पोलिसांनी अटक केली. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना अखेर यश आले.
साईनगर येथील हानीफाबी मुल्ला या शेतमजूरी करत होत्या. ३ जून रोजी सकाळी ९.१५च्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या होत्या. संशयित आरोपी मुवाज मुलाणी याने त्यांना शेतातील काम दाखवतो, असे म्हणून पेठ-कापूरवाडी येथील नरसोबा मंदिराजवळील ओढयाजवळ त्यांना नेले.
त्याठिकाणी गेले असताना मुवाज मुलाणी याने हानीफाबी मुल्ला यांच्या डोक्यात पाठिमागून तसेच तोंडावर दगडाने जबर मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने मुल्ला यांच्या अंगावरील सोने काढून घेवून पळ काढला. दरम्यान सकाळी घरातून बाहेर पडलेल्या हानीफाबी मुल्ला रात्री उशीरा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.
सायंकाळी पेठ-कापूरवाडी येथील नरसोबा मंदिराजवळील ओढयात हानीफाबी यांचा मृतदेह आढळून आला. पाऊस सुरु असल्याने कोणताही ठोस पुरावा खून उघडकीस आण्यात पोलीसांना अडथळे येत होते. खूनानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुखांनी देखील भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन केले.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस संशयितापर्यंत पोहचले. त्यास विश्वासास घेवून आणखी विचारपूस केली असता त्याने चैनीसाठी सोने चोरण्याच्या उद्देशाने खून केल्याची कबूली दिली.
पोलिस निरीक्षक संजय हारूगडे, स.पो. नि. किरण दिडवाघ, सागर वरूटे, पो. उ.नि. सतिश मिसाळ, समाधान घुगे, सागर गायकवाड, पो.हे.कॉ. अरूण कानडे, अमर जंगम, पो.कॉ. अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे, जयदीप कळेकर, सचिन धोत्रे, अरूण पाटील, कुबेर खोत, अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, सुशांत चुले, सायबरचे करण परदेशी, अभिजित पाटील, सतिश आलदार, विवेक साळुंखे, अजय पाटील यांनी कारवाईत सहभाग घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
- कुटुंबाकडून संताप
संशयित आरोपी मुवाज मुलाणी याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता मुवाज याचे नातेवाईक व आई आली होती. आपल्या मुलाने खून केल्याचे समजताच यावेळी आईस राग अनावर झाल्याने तिने मुलाला हाताने कानफाटीत मारुन आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल संपात व्यक्त केला.