कुपवाड खूनप्रकरणी एकास अटक
कुपवाड :
कुपवाडमध्ये शिवशक्तीनगर येथे चार दिवसांपूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार श्रावणेशनाथ महावीर चौगुले (वय २९, रा. सिद्धिविनायक पार्क, मूळ गाव भोसे) याचा धारदार शस्त्राने खून झाला होता. खून करून पसार झालेल्या एका संशयितास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी अटक केली.
यामध्ये संशयित रितेश वसंत चव्हाण (वय २०, रा वैदुवस्ती, विलासनगर, लातूर, सध्या रा. अंबेजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्य संशयित फरार आहेत. गुलमोहर कॉलनीत चोरी केलेल्या दागिन्यांच्या वाटणीवरून केल्याची कबुली अटकतील संशयिताने दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित रितेशला अंबेजोगाई जि. बीड येथे अटक केली.
संशयित रितेश चव्हाण व त्याच्या अन्य साथीदारांनी मिळून २५ मे रोजी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास श्रावणेशनाथ चौगुले याचा खून केला. मिरज एमआयडीसी जवळील गुलमोहर कॉलनीतील एका महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी केली होती. त्या चोरीतील दागिन्यांच्या वाटणीवरून श्रावणेशनाथ व संशयित रितेश आणि त्यांच्या साथीदारांमध्ये वाद झाला होता. त्या वादात रागाच्या भरात श्रावणेशनाथ चौगुलेच्या छातीवर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची कबुली संशयिताने दिली.
खूनानंतर संशयित पसार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले होते. हवालदार सागर लवटे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार तेथील पोलिसांची मदत घेऊन संशयितांचा बीड व लातूर जिल्ह्यात शोध घेतला. संशयित आंबेजोगाई येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव रितेश वसंत चव्हाण असे सांगितले.