देवगडात अवैध गांजा पीक लागवड प्रकरणी एकास अटक
गांजाची २३ झाडे पोलिसांनी केली जप्त
देवगड / प्रतिनिधी
कोटकामते आडिवरेवाडी येथे आपल्या घरासमोरील परिसरात (कंपाऊंड) अवैध गांजा पिकाची लागवड केल्याप्रकरणी तेथील ओंकार राजाराम कोतेकर (३०) या संशयितावर देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई २९ मे २०२६ रोजी करण्यात आली. संशयिताकडून सुमारे ४९ हजार रूपये किंमतीची २ किलो ४५० ग्रॅम वजनाचे ताजे ओलसर गडद हिरव्या रंगाचे, उग्र वासाचे ३ ते ५ फूट उंचीची गांजाची २३ झाडे देवगड पोलिसांनी जप्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अवैध धंदे व अमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात एनपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार महेंद्र महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल गणपती गावडे, रवींद्र महाले, प्रसाद आचरेकर, डोईफोडे यांच्या पथकाने केली.