निर्माल्यापासून तयार होणार दीड टन सेंद्रिय खत
चिपळूण :
यावर्षी गणेशभक्तांनी नगर परिषदेच्या कलशांमध्ये तब्बल अडीच टन निर्माल्य जमा केले. त्यामुळे यापासून दीड टन सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया कचरा प्रकल्पात सुरू झाली आहे. गणेशभक्तांनी दिलेल्या प्रतिसादामुळे नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचा प्रशासनाचा संकल्प सफल झाला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी भक्तांचे आभार मानले आहेत.
वाशिष्ठी व शिवनदीचे पात्र स्वच्छ रहावे, यासाठी नगर परिषद गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला घरातील कचरा नद्यांमध्ये टाकण्यावर बंदी घालण्यात आली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आता गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य नद्यांमध्ये टाकू नये, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सुरुवातीला काहीजण भावनिकतेचा विचार करुन ही संकल्पना स्वीकारण्यास तयार होत नव्हते. मात्र त्यांना नद्यांचे महत्व पटवून दिल्यानंतर आता भाविक स्वतःहून विसर्जन घाटाजवळ असलेल्या कलशांमध्ये निर्माल्य जमा करताना दिसत आहेत.
यातूनच यावर्षी शहरातील २३ विसर्जन घाटांवर ठेवलेल्या कलशांमध्ये नागरिकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर अडीच टन निर्माल्य जमा केले. ते नगर परिषदेने घंटागाड्यांमधून आपल्या शिवाजीनगर येथे असलेल्या घन कचरा प्रकल्पात नेले आहे. तेथे ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशिनमध्ये टाकून त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे.
ही सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या देखरेखीखाली येथील कर्मचारी करीत आहेत.
- नागरिकांना धन्यवाद !
नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्याची सुरुवात आपल्यापासून केली आहे. ही बाब अधिक महत्वाची असून निर्माल्यही नदीपात्रांमध्ये न टाकता कलशांमध्ये जमा करून प्रशासनाला केलेले सहकार्य खरोखरच मोठे आहे. त्यामुळे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी असून स्वच्छतेबाबत असेच सहकार्य केल्यास नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणात कोकण, राज्य स्तरावरच नव्हे तर देशातही अव्वल ठरेल.
- विशाल भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद चिपळूण
- प्लास्टिक पिशव्यांचा वापरही कमी
नागरिकांनी आता शहर स्वच्छतेला अधिक महत्व दिल्याचे अनेक कृतींवरुन दिसून येत आहे. याचा मोठा प्रत्यय गणेश विसर्जनावेळी आला. भक्तांनी आणलेले निर्माल्य नदीपात्रात न टाकता कलशांमध्ये ठेवले. यामुळे सर्वच भागातील नदीपात्रे स्वच्छ दिसून आली. विशेष म्हणजे निर्माल्य आणण्यासाठी यावर्षी प्लास्टिक पिशव्यांचा वापरही कमी झाला. ही समाधानकारक बाब मानली जात आहे.