इंटर्नशिप योजनेसाठी दीड लाख अर्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आकारास आलेल्या युवकांसाठीच्या इंटर्नशिप योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या योजनेतून प्रशिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी 1 लाख 55 हजार युवकांनी अर्ज केला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल 12 ऑक्टोबरला सादर करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये दीड लाखांहून अधिक अर्ज या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना भारतीय उद्योग क्षेत्रातील विविध विभागांमध्ये काम करण्याची आणि कामातून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक युवकाला एक वर्षभर महिना 6 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. तसेच 6 हजार रुपयांचा एकवेळ अनुदान मिळणार आहे. या योजनेचा प्रारंभ 2 डिसेंबरपासून होणार आहे. या कार्यानुभवाचा उपयोग या तरुणांना नंतर मोठ्या वेतनाचे काम मिळविताना होणार आहे. या योजनेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून प्रारंभीचा व्यय 800 कोटी रुपयांचा होणार आहे.
आधारवर प्रवेश
या योजनेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डाचा तसेच बायोमेट्रिक ओळखीचा आधार घेतला जाणार आहे. देशातील 500 हून अधिक कंपन्यांमध्ये या योजनेच्या लाभार्थी युवकांना काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना विशिष्ट क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळणार आहे. ही योजना 21 वर्षे ते 24 वर्षे या वयोगटातील युवक-युवतींसाठी आहे. पोर्टल सादर झाल्यापासून केवळ एका दिवसात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे ही योजना लोकप्रिय होईल असा विश्वास सरकारला आहे.