महिनाभरात दीड कोटीचा मुद्देमाल जप्त
चिकोडी अबकारी विभागाची धडाकेबाज कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तपासनाके उभे करून वाहनांची तपासणी केली जात आहे. चिकोडी येथील अबकारी विभागाच्या बेळगाव उत्तर विभागीय अधिकाऱ्यांनी महिनाभरात सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.
चिकोडी विभागाचे अबकारी उपायुक्त प्रशांतकुमार के. यांनी शनिवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 16 मार्च 2024 पासून 19 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून 1 कोटी 65 लाख 68 हजार 191 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यानंतर रोज वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. गस्तही वाढविण्यात आली आहे. या काळात 57 गंभीर, 49 सामान्य व 362-15(ए) अशी एकूण 468 अबकारी प्रकरणे दाखल करून 570 जणांना अटक करण्यात आली आहे.
महिनाभरात केलेल्या या कारवाईत 18 हजार 516 लिटर भारतीय बनावटीची दारू, 73 हजार लिटर परराज्यातील दारू, 153 लिटर शिंदीची दारू, 330 लिटर गावठी दारू, 83 लिटर बियर जप्त करण्यात आली. बेकायदा दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 34 दुचाकी, 4 कार व दोन अवजड वाहने अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.